फडणवीसांपाठोपाठ शरद पवारही पोहोचले दिल्लीत, राजकीय गोटात विविध चर्चांना उधाण

नवी दिल्ली : २६ नोव्हेंबर – राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे यापूर्वीच दिल्लीत आहेत. भाजपचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीला पोहोचल्यानंतर आता शरद पवार दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय गोटात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी आपले मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द करुन अचानक दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल सुद्धा आहेत. एबीपी माझा वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
वृत्तानुसार, दिल्लीत असलेल्या चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींसोबत बैठक सुरू आहे. त्यातच शरद पवार दिल्लीत पोहोचले आहेत. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा हा दौरा यांचा संबंध नाहीये. असं सांगितलं जात आहे की, विरोधकांची दिल्लीत बैठक आहे आणि या बैठकीत सहभागी होण्यासाठी शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार या राजनाथ सिंह यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांचे मुंबईत काही कार्यक्रमम होते मात्र, त्यांनी ते रद्द करत दिल्लीला रवाना झाले आहेत. भाजप नेतेही दिल्लीत आहेत. राजकारणात सधी काय होईल याचा अंदाज वर्तवण्यात येऊ शकत नाही. शरद पवार दिल्लीत आल्याने आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या दौऱ्यात वेगळं काही समीकरण होतं का हे पहावं लागेल.
यासोबतच संसदेच्या डिफेन्स कमिटीची दुपारी बैठक आहे. शरद पवार हे या कमिटीचे सदस्य आहेत आणि त्या बैठकीसाठी शरद पवार दिल्लीत दाखल झाले असल्याचं बोललं जात आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील भाजप नेते दिल्लीत असताना शरद पवारही दिल्लीत पोहोचल्याने चर्चांना उधाण आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील यांचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत शाह-पाटील यांच्या भेटीची माहिती दिली आहे. याशिवाय चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर देखील याबाबतची माहिती दिली होती.

Leave a Reply