विद्यार्थिनीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : २५ नोव्हेंबर – विद्यार्थिनीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विक्की चकोले, असे आरोपीचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी वादातून आरोपी विक्कीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने गोळी बंदुकीतच अडकल्याने मोठा अनर्थ टळला होता. तेव्हापासून अजनी पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत होते. आज (दि. २५) सकाळी आरोपी नागपूर रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानकावर सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.
विद्यार्थीनीला ठार मारण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आरोपी पुण्याला पळून गेला होता. तिथे गेल्यानंतर त्याने आपला मोबाईल विकून मिळालेल्या पैश्यातून दोन दिवस काढले. दरम्यान, त्याच्या जवळील पैसे संपल्यामुळे तो नागपूरला परत आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी रेल्वे स्टेशनवर सध्या वेशात तैनात करण्यात आले होते. आरोपी विक्की दिसताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे
आरोपी हा पुण्याला पळून गेल्यानंतर त्याला केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्यामुळे तो आत्महत्या करण्याच्या विचारात होता. नागपूर रेल्वे स्टेशनवर वावरताना त्याची कृती ही आत्महत्या करण्याचीच दिसत होती, असा खुलासा पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी केला आहे.
पीडित तरुणी ही वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. शिक्षणासाठी ती नागपूरला राहते. तर आरोपी विक्की चकोले हा नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील रहिवासी आहे. सोमवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास पीडित विद्यार्थीनी काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाली असताना आरोपी हा पार्किंगमध्ये तिची वाट बघत होता. ती गाडी घेण्यासाठी पार्किंगमध्ये गेली असता आरोपीने तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापले विक्कीने तिच्यावर बंदूक रोखली. आरोपीने दोन वेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळी बंदुकीत अडकल्याने अनर्थ टळला. त्याचवेळी तेथील कर्मचारी जात असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी मुलीला वाचवण्यासाठी धाव घेतली तोपर्यंत आरोपी विक्की घटनास्थळावरून पळून गेला.

Leave a Reply