मिरची तोडणी करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो उलटून २१ मजूर जखमी

भंडारा : २५ नोव्हेंबर – मिरची तोडणी करण्यासाठी मजूरांना घेऊन जाणारी टाटासुमो उलटल्याने २१ मजूर जखमी झाले. सदर घटना कांद्री-रामटेक राज्यमार्गावरील वासेरा गावाजवळ आज घडली. या अपघातातील जखमींमध्ये १९ महिला असून एका ४ वर्षीय मुलासह चालकाचा समावेश आहे.
मोहाडी तालुक्यातील पिटेसूर येथून नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील येथील आसोली गावात मिरची तोडण्याकरिता सकाळच्या सुमारास टाटासुमो क्रमांक २६/५५५२ या वाहनाने महिला मजूर जात होत्या. दरम्यान सकाळी १० वाजता सुमारास वासेरा गावाजवळ वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमो वाहन उलटले. यात वाहनाचा अक्षरक्षा चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच आंधळगावचे पोलिस निरीक्षक सुरेश मठ्ठामी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश ताराचंद मते, विजेंद्र सिंगनजुडे, बाबुराव हुलमुंडे यांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
जखमींमध्ये आरती मुलचंद नेवारे (१८), दिपाली पितांबर खोब्रागडे (२१), अश्विनी अरविंद तिरपुडे(४५), शिला राजेंद्र साखरे(३५), वैशाली चंदन उके (३५), सुरेखा गोपाल शेंडे (३१), माया परमेश्वर उके (४५) यांना मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तर ओमलता धनपाल नेवारे(२९), कल्पना पितांबर खोब्रागडे (४५), संघमित्रा गेडाम (५०), लक्ष्मी रंगराव उके (५०), अंजनी ज्ञानेश्वर उके(५५), सुकेशनी राजेंद्र तिरपुडे (३२), अनिता सुरेश अडमाचे (३५), उषा सुरेश राऊत (३८), लता संतोष साखरे (३८), शीला राजेंद्र साखरे (३५), चंद्रकला जीवन चौधरी (६०), प्रमिला चित्रपाल बिंजेवार (४८), निरंजना तागडे (४१), मनिषा ईश्वरद्याल शेंडे (४०), सुमो चालक परमेश्वर इशरत ऊके (४०) व मुलगा प्रियांश परमेश्वर उके(४) हे गंभीर जखमी असल्याने त्यांना प्रथमोपचारानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. मोहाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र सोनवाणे, डॉ.शिल्पा टांगले, अधिपरिचरिका अनिता हुसेन, किर्ती शर्मा, वैशाली पाटील, आनंद गुनेरिया, पिंकी बघेले हे जखमींवर उपचार करीत आहेत.

Leave a Reply