मध्यप्रदेशात एनएसयूआय कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

भोपाळ : २५ नोव्हेंबर – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय)च्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा घेराव करण्याची तयारी केल्यावर मोठा गोंधळ झाला. त्यावर पोलिसांनी एनएसयूआय कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. त्यामुळे भोपाळमधीस रस्त्यांवर चांगलाच गोंधळ उडाला. शिक्षण वाचवा, देश वाचवा मोहिमेअंतर्गत भोपाळमध्ये एनएसयूआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. यासंदर्भात प्रदेश काँग्रेस कार्यालयात बैठक सुरू होती. या बैठकीला माजी मुख्यमंत्री कमलनाथ देखील उपस्थित होते. दरम्यान, एनएसयूआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा घेराव घालण्यासाठी बाहेर पडले. त्यामुळे गोंधळ रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तैनात असलेल्या पोलिसांनी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला.
मध्य प्रदेश सरकार लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारणार असल्याने त्या विरोधात काँग्रेसचे युवा नेते पक्ष कार्यालयापासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला होता. दगडफेकीच्या घटनांची नोंद झाल्यानंतर भोपाळ पोलिसांनी काँग्रेसच्या युवा आघाडीच्या काही नेत्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप आहे. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मात्र, परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
केंद्राने गेल्या वर्षी जाहीर केलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मध्य प्रदेश सरकार स्वीकारणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेचा शिक्षणाचे माध्यम म्हणून वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. मातृभाषेमुळे विद्यार्थ्यांना क्लिष्ट संकल्पना सहज समजू शकते म्हणून स्थानिक भाषा इयत्ता आठवीपर्यंत प्राधान्याने वापरली जाईल.
नवीन धोरणानुसार, पारंपारिक १०+२ शालेय अभ्यासक्रमाची रचना अनुक्रमे ३-८, ८-११, ११-१४ आणि १४-१८ वर्षे वयोगटातील ५+३+३+४ रचनेने बदलली जाणार आहे.

Leave a Reply