पोलीस ठाण्यातच पोलिसांवर बाप-लेकाने चढवला हल्ला

भंडारा : २५ नोव्हेंबर – वडिलांच्या इच्छेविरुद्ध मुलीने एका मुलाशी लग्न केले. घरचे रागावतील म्हणून दोघेही तरूण-तरुणी पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी पोलिस ठाण्यात आलेल्या तरुणीच्या वडिल आणि भावाने पोलिस ठाण्यात आरडाओरड करीत मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला करुन जखमी केले. जिल्ह्यातील पवनी पोलिस ठाण्यात ही अजब घटना घडली.
पवनी पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या शिरसाळा येथील एका तरुण मुलीने वडिलाच्या इच्छेविरुद्ध एका तरुणाशी २२ नोव्हेंबर रोजी लग्न केले. लग्न झाल्यानंतर घरची मंडळी रागावतील म्हणून लग्नाची माहिती देण्यासाठी दोघेही त्याचदिवशी पवनी पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली. पोलिसांनी त्यांना स्वागत कक्षात बसविले. दरम्यान, काही वेळानंतर मुलीचे वडिल देवचंद काटेखाये (५४) व भाऊ अतुल काटेखाये (२१) पोलिस ठाण्यात आले. आल्याबरोबर त्यांनी शिवीगाळ आणि आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तरुण आणि तरुणीला मारण्याचा प्रयत्न केला असता तिथे हजर असलेले पोलिस नायक चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अतुल काटेखाये याने पोलिस नायक चव्हाण यांच्या खाकी गणवेशाची कॉलर पकडून त्यांना भिंतीवर ढकलले. त्याचवेळी पोलिस हवालदार नागरीकर यांनी दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही दोघांनी धक्काबुक्की केली. यात नागरिकर यांच्या हाताला दुखापत झाली.
याप्रकरणी पोलिस नायक चव्हाण यांच्या तक्रारीवरून देवचंद काटेखाये आणि अतुल काटेखाये यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, ३३२, ३४, सहकलम १२0 नुसार गुन्हा नोंदविला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक हारगुडे करीत आहेत.

Leave a Reply