७० रुपयांची लाच घेताना सेतू कार्यालयातील संगणक ऑपरेटर चतुर्भुज

नागपूर : २४ नोव्हेंबर – उत्पन्नाचा दाखल देण्यासाठी ७० रुपयांची लाच घेणाऱ्या तहसील कार्यालयातील सेतू केंद्राच्या संगणक ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. पवन एकनाथ बिनेकर (वय ३१, रा. खैरीपुरा, लालगंज), असे अटकेतील लाचखोराचे नाव आहे. लाचेची ही रक्कम कमी असली, तरी रोज शेकडो नागरिक उत्पन्नाचा दाखल काढतात. त्यामुळे या माध्यमातून गरजू नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.
तक्रारदार खासगी काम करीत असून तो इतवारी भागात राहतो. त्याची मुलगी बारावीत शिकते. मुलीच्या शिष्यवृत्तीसाठी तक्रारदाराला उत्पन्नाचा दाखल हवा होता. यासाठी त्याने तहसील कार्यालयात अर्ज केला. मात्र, त्याला उत्पन्नाचा दाखल मिळाला नाही. त्याने पवन याच्याकडे विचारणा केली असता दाखला देण्यासाठी त्याने तक्रारदाराकडे ७० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदराने एसीबीचे अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रार केली. ओला, अतिरिक्त अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन बलीगवार, हेडकॉन्स्टेबल अशोक बैस, सारंग बालपांडे, महिला शिपाई, कांचन गुलबासे, शारीक शेख यांनी मंगळवारी तहसील कार्यालयात सापळा रचला. लाच घेताच एसीबीच्या पथकाने पवन याला अटक केली. त्याच्याविरुद्ध सदर पोलिस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
१०० रुपयांच्या आत लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली ही तिसरी कारवाई होय. यापूर्वी जुलै २०१५मध्ये ठाणे एसीबीच्या पथकाने मिरा-भाईंदर महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी राकेश त्रिभुवन याला फेरीवाल्याकडून ३० रुपयांची लाच घेताना पकडले होते. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी नागपूर एसीबीने कृषी विभागाच्या एका कर्मचाऱ्यालाही ३० रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती, अशी माहिती एसीबीच्या सूत्राने दिली.

Leave a Reply