संपादकीय संवाद – महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कायद्याचा बडगा दाखवणे चुकीचे

अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी महावितरणाच्या कार्यालयासमोर गळफास लावून आत्महत्या करण्याच्या केलेल्या प्रयत्नाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात वीजबिलाची थकबाकी आहे, त्यामुळे वीजबिल वसुली जोरात सुरु आहे. आणि त्यात मध्यमवर्गीय माणूस आणि गरीब शेतकरी मोठ्या प्रमाणात भरडला जातो आहे, त्याच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्च्यासमोरच मुरकुटेंनी हा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडणे साहजिकच म्हणावे लागेल.
कोरोना काळात राज्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना अर्धपगारी काम करावे लागले. दिवसभर मेहनत करून हातावर कमावणाऱ्या छोट्या व्यावसायिकांची तर पुरती वाट लागली. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी घरूनच काम सुरु होते, परिणामी विजेचा वापर जास्त झाला. त्यामुळे जनसामान्यांना भरसमसाठ वीजबिल आले. भरीस भर म्हणून मधल्या काळात वीज वापराचे दरही वाढवले गेले परिणामी, सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले.
कोरोना काळ सुरु झाला तेव्हा महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांनी वीजबिलात सवलत दिली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र नंतर त्याच मंत्र्यांनी घुमजाव केले, या सर्व प्रकारात महावितरण आर्थिक अडचणीत आल्याची ओरड करत मोठ्या प्रमाणात वीजवसुली सुरु केली. त्यात मग जनसामान्यांच्या घरातली, व्यवसायातली आणि शेतातली वीज कापायला सुरुवात केली.
या सर्व प्रकारामुळे जनसामान्य संतापला नसता तरच नवल. जनसामान्यांनी विविध मार्गाने विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र, सरकार दाद द्यायला तयार नव्हते. नाही म्हणायला सुरुवातीला हफ्ते पाडून वीजबिल भरण्याची सवलत दिली जात होती, नंतर ही सवलतही रद्द झाली. ऊर्जामंत्र्यांनीच ही सवलत रद्द केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जनसामान्य हैराण झालेले आहेत. त्यातून मग महावितरणचे कर्मचारी आणि जनसामान्य यांच्यात संघर्षाचे प्रसंगही उद्भवत आहेत. मध्यंतरी नागपुरात महावितरणच्या एका कर्मचाऱ्याला ग्राहकाने मारहाण केल्याचीही घटना घडली, परिणामी महावितरणचे कर्मचारी नागपुरात वसुलीला जात नव्हते. आता पुन्हा जायला सुरुवात केली असल्याची माहिती आहे.
महाआघाडी शासनाच्या हटवादी धोरणामुळेच मग अशी परिस्थिती उद्भवते आहे. नगर जिल्ह्यात देखील विबिल वसुलीसाठी जनसामान्यांची वीज तोडू नये या मागणीसाठीच मुरकुटेंच्या नेतृत्वात मोर्चा निघाला होता, तिथेच त्यांनी गळफास लावण्याचे पाऊल उचलले अशी माहिती आहे. ज्याअर्थी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले त्याअर्थी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अरेरावी केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वीज वापरल्यावर बिल मागणे यात वावगे काहीही नाही. मात्र वसुली करतांना माणूसकुशुन्य वर्तन असू नये इतकीच जनसामान्यांची अपेक्षा असते, नेमकी हीच अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे संघर्ष वाढतो आहे.
यावर उपाय एकच आहे सरकारने जनसामान्यांना वीजबिल माफ करणे शक्य नसेल तर किमान व्याजाची रक्कम माफ करावी आणि जी थकबाकी बाकी निघेल ती ग्राहक सहज देऊ शकेल इतक्या सुलभ हफ्त्यात देण्याची परवानगी द्यावी. सर्वसामान्य माणूस पैसे बुडविण्याच्या मानसिकतेत नसतो, त्याला सवलत हवी असते, ही सवलत दिली तर जनसामान्य मोठ्या प्रमाणात वीजबिल भरतील यात शंका नाही. त्याचबरोबर महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीही आपले वर्तन सुधारणे गरजेचे आहे. थकबाकी आहे हे मान्य मात्र त्याचवेळी ग्राहकांची अडचणही समजून घेणे गरजेचे आहे. हातात बडगा उचलून जनसामान्यांना वेठीस धरल्यास ते रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातून अराजकाची शिटी निर्माण होऊ शकेल याची जण महावितरणच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ठेवणे गरजेचे आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply