नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ५ उमेदवार रिंगणात

नागपूर : २४ नोव्हेंबर – स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची अर्ज प्रक्रिया मंगळवारी पूर्णत्वास आली आहे. नागपूर मतदारसंघातून प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष असे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहे. येत्या २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे कोण उमेदवारी अर्ज मागे घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या भाजपकडे जवळपास ७0 मतांचे मताधिक्य आहे, असे सांगण्यात येत आहे. परंतु उमेदवारी दाखल झाल्यानंतर आता खर्या अर्थाने विजयाचे गणित जुळविण्यासाठी जोडतोडीच्या राजकारणाला उधाण येणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून एकमेकांचे सदस्य फोडण्याचा प्रयत्न होणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणात काँग्रेस व भाजपपुढे आपल्याच सदस्यांना सांभाळण्याचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे.
विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पारडे जड आहे. एकूण ५५६ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. आजवर नागपुरातून या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपचे गिरीश व्यास यांनी केले. आता त्यांची टर्म संपुष्टात येत असल्याने निवडणूक होत आहे. त्यामुळे यंदा भाजपने येथून माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारीच्या रिंगणात उतरवून एकप्रकारे त्यांचे राजकारणात पुनर्वसनच केले आहे. तर भाजपला रामराम करून काँग्रेसमध्ये गेलेल्या नगरसेवक रवींद्र भोयर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. मंगळवारी शक्तिप्रदर्शनाद्वारे त्यांनी आपला उमेदवारी अर्जही सादर केला. त्यासोबतच काँग्रेसचेच ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला आहे. याशिवाय दोन अपक्ष असे एकूण ५ उमेदवारांनी १0 अर्ज सादर केले आहे. बुधवार, २४ नोव्हेंबरला दाखल अर्जांची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर आहे. तर १0 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Leave a Reply