नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयात सुरक्षारक्षकांची दारु पार्टी सोशल मीडियावर व्हायरल

नागपूर : २४ नोव्हेंबर – चक्क रुग्णालयातच दारू पार्टी होत असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरातून समोर आला आहे. नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील सुरक्षारक्षकांच्या दारू पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयाची सुरक्षा ज्यांच्या खांद्यावर असते तेच सुरक्षारक्षक रुग्णालयात दारू पार्टी करत असल्याने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील दारू पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत दिसणारे आणि पार्टीत मग्न असलेले हे दुसरे-तिसरे कुणी नाही तर रुग्णालयाचे सुरक्षारक्षकच असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सुरक्षारक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालये आहेत. ज्यामध्ये ठाणे, पुणे, नागपूर, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. या मनोरुग्णालयात अतिशय कडेकोट सुरक्षाव्यवस्था असते. मात्र, यापैकीच एक असलेल्या नागपूर येथील मनोरुग्णालयात सुरक्षारक्षकांकडून अशाप्रकारे दारू पार्टी होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, रुग्णालयातील गार्ड रूममध्ये ही ओली पार्टी रंगली होती. या पार्टीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर या ओल्या पार्टीचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक यांनी सुरक्षारक्षक आणि उपस्थित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

Leave a Reply