मेडिकलमधील इंटर्न डॉक्टरवर फेसबुक फ्रेंडने बंदूक ताणून केला जीव घेण्याचा प्रयत्न

नागपूर : २३ नोव्हेंबर – नागपूर शहरातील मेडिकल रुग्णालयात सोमवारी खळबळजनक घटना घडली. फेसबुकवरून मित्र बनलेल्या आरोपीने मेडिकलमधील इन्टर्न डॉक्टरवर बंदूक ताणली. यावेळी त्याने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण, गोळी बंदुकीतच अडकली. दरम्यान, इन्टर्न डॉक्टरने आरडाओरड केल्यानंतर काही विद्यार्थी मदतीला धावून आल्यानंतर आरोपी प्रियकराने पळ काढला. परंतु, या घटनेनंतर मेडिकलमध्ये एकच खळबळ उडाली. विक्की चकोले (रा. सावनेर, खापरखेडा) असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, इन्टर्न डॉक्टर आणि आरोपी यांच्यात फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. फिर्यादीने पॅरामेडिकल टेक्नालॉजी (बीपीएमटी) अभ्यासक्रम पूर्ण केला असून इन्टर्न डॉक्टर म्हणून मेडिकल येथे एक वर्षाची सेवा देत आहे. दरम्यान, इन्टर्न डॉक्टरने आरोपीसोबत सर्व संबंध संपुष्टात आणत बोलणे बंद केल्यानंतर आरोपीने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने त्याला प्रतिसाद न देता त्याच्याशी बोलणे टाळले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आरोपी हा अचानक मेडिकलमधील अधिष्ठाता इमारतीच्या शेजारी असलेल्या ई-लायब्ररीसमोर आला. यावेळी इन्टर्न डॉक्टर आणि आरोपीमध्ये वाद झाला. या वादात आरोपीने त्याच्या खिशात असलेली बंदूक काढली आणि गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. इन्टर्न डॉक्टरने लगेच आरडाओरड केली. मदतीची हाक ऐकाला येताच आजूबाजूला असलेले काही विद्यार्थी मदतीला धावून आले. ऐवढय़ातच आरोपी पळून गेला. या प्रकरणाची माहिती अजनी पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

Leave a Reply