दंगलीची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी करण्यात यावी – चंद्रकांत पाटील

मुंबई : २३ नोव्हेंबर – त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना धार्मिक स्थळाची नासधूस झाल्याची बनावट चित्रफित पसरवून मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे दंगली घडवून आणल्या गेल्याचा आरोप करत या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी करण्यात यावी,अशी मागणी भाजपातर्फे चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
“त्रिपुरामध्ये कोणतीही मशिद पाडली गेलेली नसताना एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करुन मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये एका समाजाच्या समूहाने हिंसाचार केला. त्याची प्रतिक्रिया म्हणून अमरावतीमध्ये लोक रस्त्यावर आले. त्यांना अटक करण्यात आली. हे सर्व न कळणारे आहे. २०१४ ते २०१९ मध्ये भाजपाचे सरकार असताना एकही दंगा झाला नाही. मात्र ४० हजार लोकांचा मोर्चा निघतो त्याची सरकारला पूर्वकल्पना मिळत नाही. त्यांनी निष्पाप लोकांच्या मालमत्तेचे नुकसान केले तरीही त्यांच्यावर कारवाई नाही. अशा घटना रोखण्यासाठी निघालेल्या लोकांवर मात्र कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी महाराष्ट्र शासनाला इशारा देण्यासाठी भाजपातर्फे राज्यात आंदोलन करत आले होते,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
“जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी करायची असेल तर सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधिशांकडून याची चौकशी व्हायला हवी. रझा अकादमीचा यात काही सहभाग आहे का याचा तपास व्हायला हवा. ही मागणी महाराष्ट्रातील कायदा सुवव्यवस्थेच्या दृष्टीने आम्ही मांडत आहोत. ही वादळापूर्वीची शांतता असू शकते. म्हणून आंदोलने करण्यात आली,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
“कोल्हापुरला आंदोलन करण्यासाठी प्रशासनाने विरोध केला आहे. ४० हजारांच्या मोर्चाल आणि हिंसाचाराला परवानगी देण्यात येते पण शांततेच्या मार्गाने करण्यात येणाऱ्या निदर्शनांना विरोध करण्यात आला. प्रशासनाचे मागणे आम्ही मान्य केले. अधिकाऱ्यांना आम्ही सांगितले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हे निवेदन जसेच्या तसे पाठवू नका. कोल्हापूर जिल्ह्याची माहिती त्यासोबत द्या. या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही अदृश्य घटना सुरु आहेत. त्या तपासा आणि मुख्यमंत्र्यांना पाठवा असे आवाहन आम्ही केले आहे,” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे. महाराष्ट्रात जेव्हा दोन गटांमध्ये हिंसाचार होतो तेव्हा त्याची मुळे रझा अकादमीमध्ये आढळतात. सीमीचे नवीन रुप रझा अकादमी आहे. प्रशासनाने कारवाई करुन यावर बंदी आणायला हवी असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
“अमरावतीच्या पालकमंत्री या विशिष्ट समुदयाची मते महाविकास आघाडीला मिळावीत यासाठी त्यांना पदराखाली घालत आहेत. त्यांना वाचवत आहेत हे चालणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली हे पालकमंत्र्याना चालले नाही. सुरुवात ज्यांनी केली त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात की नाही. त्यावर प्रतिक्रिया दिलेल्यावर कारवाई केली”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply