नांदेडमध्ये झालेल्या दंगलीचे कटकारस्थान करणाऱ्यांना राजाश्रय – नाव न घेता अनिल बोंडे यांचा अशोक चव्हाणांवर आरोप

नांदेड : २२ नोव्हेंबर – त्रिपुरातील कथित घटनेनंतर राज्यात उसळलेल्या दंगलीची चौकशी करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. नांदेडमध्ये माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली. त्यावेळी बोलताना बोंडे यांनी काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं नाव न घेता जोरदार टोला लगावलाय.
नांदेडमध्ये झालेल्या दंगलीचे कटकारस्थान करणाऱ्यांना राजाश्रय असल्याचा खळबळजनक आरोप अनिल बोंडे यांनी केलाय. अमरावती, मालेगाव आणि नांदेड इथल्या दंगलखोरांवर कारवाई करा, अशी मागणी करत भाजपनं धरणं आंदोलन केलं. नांदेडमध्ये अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. यावेळी बोंडे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नांदेडमध्ये झालेली दंगल पूर्वनियोजित होती आणि दंगलखोरांना राजाश्रय दिला जात आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, असी मागणीही बोंडे यांनी केली आहे.
राज्यात मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे झालेल्या दंगलींची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करावी. या मागणीबरोबरच दंगलीच्या निषेधार्थ ठाणे शहर भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले.

Leave a Reply