संपादकीय संवाद – मतदार नोंदणीसाठी सुयोग्य यंत्रणा उभारली जाणे महत्वाची

लवकरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यामुळे राज्यभरात मतदार नोंदणीची मोहीम जोरात सुरु झाली आहे, परिणामी प्रशासनातील अधिकारी नागरिकांना आपले नाव मतदार यादीत नोंदवून घेण्याचे आवाहन करीत आहेत.
असे आवाहन करून सर्वच मतदार आपले नाव नोंदवतील काय? आणि या नोंदणीतून तयार होणाऱ्या मतदार याद्या पूर्णतः निर्दोष आणि सर्वसमावेशक राहतील काय? हा खरा कळीचा मुद्दा आहे. गेल्या काही वर्षात प्रसारित होणाऱ्या नोवडणूक याद्या बघितल्यास या याद्या पूर्णतः निर्दोष नाहीत असे दिसून येते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मतदार याद्यांबद्दल तक्रार केली होती. सामान्य नागरिकांनाही सदोष मतदार याद्यांचे अनेक अनुभव येतात, तश्या तक्रारीही माध्यमांपर्यंत पोहोचतात, मात्र पुढे काहीच होत नाही.
आपल्या देशातील कायद्यानुसार १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीचे नाव तो राहत असलेल्या भागातील मतदार यादीत नोंदले जायला हवे, एखाद्या भागातील यादीत नाव येण्यासाठी ती व्यक्ती त्या भागात ६ महिन्यांपासून वास्तव्याला असली पाहिजे अशी अट आहे. त्याचप्रमाणे एका व्यक्तीचे नाव एकाच ठिकाणी नोंदलेले असायला हवे. मात्र प्रत्यक्षात असे घडतांना दिसत नाही, पूर्वी आपल्या देशात अशी पद्धत होती की सार्वत्रिक निवडणुकांच्या ७ ते ८ महिने आधी प्रशासनातील कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन जुन्या यादीनुसार नावे आहेत काय? याची तपासणी करायचे त्यावेळी नव्याने वास्तव्याला आलेले मतदार आणि नव्याने वयाची १८ वर्ष पूर्ण केलेले मतदार यांचीही नोंद व्हायची. आधी नोंदलेल्या ज्या मतदारांनी ती वस्ती सोडून दुसरीकडे प्रस्थान केले असेल, किंवा जे नोंदलेले मतदार मृत झाले असतील, त्यांची नावे आपसूकच मतदार यादीतून वगळली जात असत. या प्रक्रियेतून याद्या तयार होऊन निवडणुकीच्या ४ ते ५ महिने आधी याद्या प्रसिद्ध होत असत, त्या नागरिकांना तपासणीसाठी उपलब्ध करून दिल्या जात आणि त्यात नव्याने काही सुधारणा करायच्या असल्यास तश्या सुधारणाही केल्या जात असत. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी जास्तीत जास्त निर्दोष याद्या उपलब्ध होत असत.
आता मात्र परिस्थिती बदलली आहे गेल्या सुमारे ४० वर्षात ६ महिने आधी घरोघरी जाऊन मतदासरांची नावे तपासण्याची पद्धत बंद झाली आहे. परिणामी जे मतदार आपली नावे नोंदविण्यासाठी जातात त्यांचीच नावे नोंदवली जातात, अन्यथा बाकीच्यांची नवे नोंदलीच जात नाही. काही वेळा तर एकाच व्यक्तीचे नाव एकाच भागात दोनदा नोंदले गेल्याचे आढळते, वस्ती बदललेल्यांची नावे काढली जात नाही, तोच प्रकार मृतकांच्याही बाबत आहे. त्यामुळे मतदार यादीतील नावे अकारण वाढतात, याचबरोबर मतदारांना त्यांचे नाव नेमके कुठे आहे, हे कळत नाही. परिणामी अनेक लोक मतदानापासून वंचित राहतात. मतदार याद्या कारण नसतांना फुगलेल्या दिसतात. मतदारांची यात अकारण ससेहोलपट होते.
हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची योग्य अशी पद्धत नव्याने सुरु करायला हवी, त्यासाठी मतदार यादी आधार कार्ड यंत्रणेशी जोडता येते काय? हेदेखील तपासून बघण्यास हरकत नाही, मात्र या देशातील प्रत्येक पात्र नागरिक हा मतदार यादीत नोंदलेला असावा आणि एका मतदाराचे नाव एकाच ठिकाणी नोंदलेले असावे. यासाठी सुयोग्य यंत्रणा उभारली जाणे महत्वाची आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply