शरद पवार ४ दिवसीय विदर्भ दौऱ्यावर, उद्या नागपुरात होणार आगमन

नागपूर : १६ नोव्हेंबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या (बुधवार)पासून चार दिवसीय विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. नागपूरपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. बुधवारी सकाळी थेट दिल्लीवरून ते विशेष विमानाने नागपुरात येतील. त्यानंतर नागपूरसह विदर्भातील आयोजकांसह व्यापाऱ्यांसोबत शरद पवार बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दिली आहे.
पुढील वर्षी नागपूरसह अमरावती आणि चंद्रपूर महानगरपालिका निवडणूका होऊ घातल्या आहेत. सध्या नागपूरच्या राजकारणात आणि महानगरपालिकेत राष्ट्रवादीची स्थिती फारसी चांगली नाही. त्यामुळे पक्षात नवा प्राण फुंकण्यासाठी शरद पवार यांचा विदर्भ दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांची एक बैठकदेखील घेणार आहे. त्यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्याला उद्या (१७ नोव्हेंबर)पासून सुरुवात होणार आहे. पहिला दिवस (बुधवारी) ते नागपूर शहरात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील. त्यांनतर गुरुवारी सकाळी नागपूरवरून मोटारीने गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे जातील. त्याठिकाणी बैठक घेतल्यानंतर दुपारी ते गडचिरोली येथे जाणार आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. संध्याकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत ते संवाद साधणार आहेत. गुरुवारी चंद्रपूर येथे मुक्काम असणार आहे. तिसरा दिवस (शुक्रवारी) चंद्रपूर येथे डॉक्टर, वकील आणि उद्योगपतींसोबत बैठक घेणार आहेत. याशिवाय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. चौथा दिवस (शनिवारी) शरद पवार यवतमाळच्या दौऱ्यावर असणार आहेत

Leave a Reply