पेट्रोलचे दर अमेरिका ठरवते, केंद्र सरकारला दोष देणे योग्य नाही – रावसाहेब दानवे यांचा अजब दावा

औरंगाबाद : १६ नोव्हेंबर – पेट्रोल- डिझेलच्या किंमतीवरुन देशात विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. दिवाळीत पेट्रोल- डिझेलचा दरात सरकारने कपात केली असली तरी अजूनही इंधन दरवाढीविरोधात विरोधक केंद्र सरकारविरोधात टीका करत आहेत. मात्र, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक इंधन दरवाढीबाबत एक अजब दावा केला आहे.
इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारवर टीका होत असताना रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आणि शिवसेनेनं काढलेल्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे. औरंगाबादेत भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शक करताना ते बोलत होते.
‘इंधनाच्या वाढत्या दरांवर यांनी मोर्चे काढले. पण काँग्रेसच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती जागतिक बाजारपेठेशी जोडल्या आहेत. केंद्र सरकार रोज किंमती वाढवण्याचे काम करत नाही. केंद्र सरकार रोज किंमती खालीवर करत नाही. पेट्रोलचे दर अमेरिका ठरवते. त्यामुळं इंधन दरवाढीचा दोष केंद्र सरकारला देणे योग्य नाही. असं असतानाही केंद्र सरकारने आपला कर कमी केला,’ असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलं आहे.
तसंच, ‘राज्य सरकार राज्यातील कर कमी करण्यास तयार नाही. हा देश केवळ केंद्र सरकारच्या पैशांवर चालतो. राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून काहीही निर्णय घेत नाहीत,’ अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Leave a Reply