दंगल करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा इशारा

अमरावती : १६ नोव्हेंबर – अमरावती बंद दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत बंद’मध्ये सहभागी झालेल्या भाजपाच्या १४ नेत्यांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज पहाटे पासूनच शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून भाजपाच्या नेत्यांना अटक करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. भाजपाचे नेते आणि महापालिकेचे गटनेते तुषार भारती यांना त्यांच्या घरुन अटक करण्यात आली. त्याचबरोबर माजी आमदार अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनाही पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केलं आहे. एकीकडे हे अटक सत्र सुरु असतानाच दुसरीकडे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दंगल करणांंऱ्या एकालाही सोडणार नाही, असा थेट इशाराच दिल्याने भाजपा नेत्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.
भाजपाने १३ नोव्हेंबर रोजी अमरावती बंदची हाक दिली होती. मात्र या बंदला नंतर हिंसक वळण लागलं. त्रिपुरा राज्यात झालेल्या अत्याचाराविरोधात अमरावतीत १२ नोव्हेंबर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ ते २० हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील २० ते २२ दुकानात तोडफोड झाली. काही दुकानादारांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता तर कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न देखील निर्माण झाला. या मोर्चा विरोधात भाजपाने दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी अमरावती शहर बंदचे आवाहन केलं. मात्र, या बंद दरम्यान आंदोलकांनी हिंसा केल्याचं पहायला मिळालं. आता याच प्रकरणामध्ये पोलिसांनी भाजपाच्या १४ नेत्यांना ताब्यात घेतलं आहे.
या अटक सत्राच्या पार्श्वभूमीवर पालमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, अमरावतीत गेल्या तीन दिवसांपासून तणावपूर्ण शांतता असून काल व आज कुठल्याही प्रकारे गालबोट लागलं नाही अशी माहिती दिलीय. अमरावतीत संचारबंदी असल्याने नागरिकांना मूलभूत सुविधासाठी दुपारी दोन ते चार या वेळेला परवानगी देण्यात आली आहे. तसेच लवकरात लवकर परिस्थिती सामान्य होईल अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली.
अमरावती मधील चार ते पाच हजार पोलीस वगळता राज्य राखीव दल पोलीस बंदोबस्तसाठी तैनात असल्याचे देखील ठाकूर यांनी यावेळी सांगितले. तसेच दंगल करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही अशी भूमिका ठाकूर यांनी स्पष्ट केली आहे.

Leave a Reply