तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका आमनेसामने

नवी दिल्ली : १६ नोव्हेंबर – चीन आणि अमेरिका या जागतिक स्तरावरील दोन प्रबळ सत्तांमध्ये तैवानच्या मुद्द्यावरून सुरू असलेला तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत. हा तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एक बैठक पार पडली. मात्र, त्यानंतर दोन्ही देशांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनांवरून हा वाद किंवा तणाव काही केल्या कमी होत नसल्याचंच समोर आलं आहे. या बैठकीनंतर अमेरिकेने तैवानच्या मुद्द्यावरून चीनला इशारा दिल्यानंतर आता चीननं थेट अमेरिकेलाच धमकावलं आहे!
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावतीने बैठकीनतर एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये बैठकीत चीनकडून मांडण्यात आलेल्या भूमिकेची माहिती देण्यात आली आहे. चीनमधील सरकारी माध्यम समूह असलेल्या शिहुआच्या हवाल्याने एनडीटीव्हीनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.
“अमेरिकेतील काही लोक तैवानचा वापर करून चीनवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं करणं फार गंभीर आहे. ही कृती म्हणजे आगीशीच खेळण्याचा प्रकार आहे. जे अशा आगीशी खेळत आहेत, ते जळून राख होतील”, अशा शब्दांत शी जिनपिंग यांनी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच धमकी दिली आहे.
मात्र याचवेळी, शी जिनपिंग यांनी एकत्र मिळून काम करण्याची देखील अपेक्षा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे बिजिंगमध्ये बोलताना शी जिनपिंग यांनी जो बायडेन यांचा उल्लेख “माय ओल्ड फ्रेंड” असा केला. २००८ साली या दोघांमध्ये तत्कालीन सरकारचे प्रतिनिधी म्हणून पहिली भेट झाली होती. “आपल्याला एकत्र अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. संयुक्त राष्ट्रांचे सदस्य आणि जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था म्हणून चीन आणि अमेरिकेला परस्पर संवाद आणि सहकार्य वाढवणं आवश्यक आहे”, असं शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply