केंद्रीय राज्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत वाचवले प्रवाशाचे प्राण

मुंबई : १६ नोव्हेंबर – भाजपचे खासदार भागवत कराड यांना काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असलेले भागवत कराड हे पेशाने डॉक्टर आहेत. डॉक्टर असलेल्या भागवत कराड यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत विमानात एका प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत. इंडिगो एअरलाईन्समध्ये घडलेला हा संपूर्ण प्रकार स्वत: मंत्री भागवत कराड यांनी आपल्या फेसबूकवर एका पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे.
भागवत कराड हे १५ ऑक्टोबर रोजी इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाईटने प्रवास करत होते. विमानातून प्रवास करत असताना डॉ भागवत कराड यांच्या मागील बाजुच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा गोंधळ सुरू झाला. त्यावेळी भागवत कराड यांनी पाहिले असता एका व्यक्तीची प्रकृती खालावल्याचं त्यांना दिसून आलं. त्यानंतर त्यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत आणि क्षणाचाही विलंब नकरता या प्रवाशाच्या मदतीला धाव घेतली.
हा संपूर्ण घडलेला प्रकार भागवत कराड यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये सांगितला आहे. आपल्या फेसबूक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “प्रवास कर्तव्यदक्षतेचा… काल प्रवासादरम्यान इंडिगो फ्लाइट IndiGo मध्ये 12 A सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीटवर होतो विमानात अचानक कुजबुज सुरू झाली आणि मला कळाले. एका क्षणाचा देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याला ताबडतोब सुश्रुषा केली.”
भागवत कराड यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटलं, “आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. ” एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ” संतांची हि शिकवन कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या.”

Leave a Reply