नक्षल चकमकीत जखमी पोलीस जवानांना केले एअर लिफ्ट, नागूपरमध्ये उपचार सुरु

नागपूर : १४ नोव्हेंबर – विदर्भातील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली येथे शनिवारी पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरोधात राबविण्यात येणाऱ्या अभियानाला मोठ यश आले. शनिवारला सकाळपासून गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रांतर्गत बोटेझरी-मरदिनटोला परिसरातील जंगलात पोलिस-नक्षल चकमक झाली. परिसरात सुरू असलेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना पोलिस जवानांनी कंठस्नान घातले. या चकमकीत ४ पोलिस जवानही जखमी झाले असून, त्यांना एअर लिफ्ट करून सायंकाळी ५.३0 च्या सुमारास नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर येथे उपचारार्थ आणण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे.
पोलिस – नक्षल्यांच्या चकमकीत पोलिसांनी २६ नक्षल्यांना यमसदनी पाठविले. हल्ल्यात रवींद्र के. नैताम (४२), सर्वेश्वर डी. आत्राम (३४), महारू कोलू कुडमेथे (३४) व टिकाराम संपतराव कटांगे (४१) अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. नक्षल चकमकीत जखमी झाल्यानंतर या जवानांना एअर लिफ्ट करून हेलिकॉप्टरने सायंकाळी ५.३0 च्या सुमारास नागपुरात आणण्यात आले. नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हेलिकॉप्टर पोहचण्यापूर्वीच ऑरेंज सिटी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटरच्या डॉक्टरांचे पथक विमानतळावर तैनात होते. त्यांनी त्वरित जवानांवर तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णालयात आणून उपचार सुरू केलेत. जखमी जवानांमध्ये एकाला कान व टाळूवर, एका जवानाला मणक्याला, एकाच्या गुडघ्यावर तर एका जवानाच्या मनगटावर व हातावर गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेत.
या चारही जवानांवर ऑरेंज सिटीमधील क्रिटीकल केअर फिजिशियन डॉ. राजेश अटल, प्लास्टिक सर्जन डॉ. समीर जहांगीरदार, ऑर्थोपेडिशियन डॉ. निर्भय करंदीकर, न्यूरोसर्जन डॉ. पलक जैस्वाल, रेडिओलॉजिस्ट डॉ. निशीकांत लोखंडे, डॉ. मनीष अग्रवाल, डॉ. सौरभ जैस्वाल, पॅथालॉजिस्ट डॉ. मिलिंद पांडे व मेडिको कायदेशीर सल्लागार डॉ. निनाद गावंडे यांची चमू उपचार करीत आहेत. चारही पोलिस जवानांवर उपचार सुरू असल्याचे ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. अनुप मरार यांनी सांगितले.

Leave a Reply