उत्तरप्रदेशात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल – प्रियांका गांधी यांची घोषणा

बुलंदशहर : १४ नोव्हेंबर – काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रयांका गांधी यांनी रविवारी मोठी घोषणा केली. उत्तर प्रदेशात काँग्रेस कुणाशीही युती किंवा आघाडी करणार नाही. तर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल, असं प्रियांका गांधी यांनी घोषित केलं. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रियांका गांधींनी ही घोषणा केली. यावेळी प्रियांका गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपच्या राज्यात शेतकऱ्यांना चिरडलं जातंय, अशी टीका प्रियांका गांधींनी केली.
उत्तर प्रदेशाच्या आगामी विधानसभा निवडणुकीत कुणाशी युती किंवा आघाडी करू नये, असं अनेक पक्षा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. यामुळे आगामी यूपी निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढेल आणि सर्व जागांवर उमेदवार उभे करेल, अशी घोषणा प्रियांका गांधींनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील ‘काँग्रेस प्रतिज्ञा सम्मेलन-लक्ष्य 2022’ या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना केली.
भारत माता की जय’च्या घोषणेत शेतकरी, मजूर, महिला, श्रमिक, जवान, प्रत्येक भारतीय नागरिकाचा जय आहे, हे पंडित नेहरू म्हणाले होते’, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर यांसारख्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्याचा अर्थ माहिती होता. त्यांना स्वातंत्र्याचे मोल माहिती होते. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी घाम गाळला नाही, रक्त सांडले नाही, त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ कळणार नाही. यामुळे भाजप नेतृत्व स्वातंत्र्याचा सन्मान करत नाही, असा आरोप प्रियांका गांधींनी केला.

Leave a Reply