अकोल्यात पेट्रोलचा टँकर उलटला, जनतेने बाटल्या आणि बकेटमध्ये पेट्रोल भरून नेत लुटला

अकोला : १४ नोव्हेंबर – पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्याचं कंबरडं मोडलं आहे. अकोल्यामध्ये पेट्रोलचा टँकर उलटल्याची घटना घडली. त्यानंतर स्थानिकांनी बाटल्या आणि बकेटमध्ये पेट्रोल भरून नेण्यासाठी एकच झुंबड उडाल्याची पाहण्यास मिळाले.
अकोल्या जिल्ह्यातील व्याळा गावानजीक पेट्रोल, डिझेलचा टँकर पलटी झाल्याची घटना आज दुपारी घडली. यामुळे टँकरमधील हजारो लिटर पेट्रोल, डिझेल सुकलेल्या नाल्यामध्ये साचले. पेट्रोलचा टँकर पलटी झाल्यानंतर घटनास्थळी खबरदारी घेतली जात होती. पण, पेट्रोल आणि डिझेल सांचलेले पाहून स्थानिकांची एकच गर्दी उसळली. आधीच पेट्रोल आणि डिझेलचे दर अवाक्या बाहेर गेले आहे. त्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल सांडल्याचे पाहून स्थानिकांनी लुटण्यासाठी घरात जे सापडेल ते घेऊन घटस्थळी धाव घेतली. बघता बघता गावकऱ्यांनी एकच झुंबड उडाली,
हे पेट्रोल मिळविण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी झाली होती. जिवाची पर्वा न करता लोक हे पेट्रोल कॅनमध्ये भरून घरी नेताना दिसत होते. एवढंच नाहीतर काही महाभाग हे पेट्रोल बादलीमध्ये भरून घेऊन जात होते.
पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे अपघातग्रस्त ठिकाणी कुणी थांबू नये असं ड्रायव्हर सांगत होता, पण लोक त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत इंधन चोरी करण्यात मश्गुल होते. हा संपूर्ण जीवघेणा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर या ठिकाणी गर्दी पांगवण्यात आली. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडली नाही.

Leave a Reply