संपादकीय संवाद – काँग्रेसने इतरांवर टीका करण्यापेक्षा आधी स्वतःला सुधारावे

भाजपच्या विचारधारेमुळे काँग्रेसची विचारधारा आज संपत चाललेली आहे, त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसची विचारधारा देशभर अगदी तळागाळात पोहोचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले आहे. वर्धा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबीर प्रसंगी बोलतांना त्यांनी हे मत व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
काँग्रेसची विचारधारा खरोखरीच आज देशात अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, एका काळात या संपूर्ण देशावर काँग्रेसचेच राज्य होते. मात्र आज काँग्रेस कुठे आहे हे कंदील घेऊन शोधत फिरावे लागते आहे. आज देशात जेमतेम तीन राज्यांमध्ये काँग्रेसचे स्वबळावर सरकार आहे, आणखी दोन तीन राज्यांमध्ये तोडजोडीच्या सरकारमध्ये काँग्रेसकडे छोटासा तुकडा फेकला गेला आहे. संसदेत तर विरोधी पक्ष म्हणूनही मान्यता मिळवण्याइतपत काँग्रेसचे सदस्य नाहीत. त्यामुळे काँग्रेस सर्वदूर पोहोचवणे हे त्या पक्षाच्या अस्तित्वासाठी आज आवश्यक आहे.
मात्र आज काँग्रेसची ही अवस्था का झाली, याचाही विचार होणे गरजेचे आहे. काँग्रेसची विचारधारा निश्चितच चांगली आहे मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी त्या विचारधारेच्या विपरीत वर्तन केले आहे असे अनेकदा दिसून येते. देशाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा विचार काँग्रेस देते मात्र याच काँग्रेसच्या नेत्यांच्या सत्तेच्या लालसेमुळे देशाचे विभाजन झाले हे देश विसरू शकत नाही. या काँग्रेसने सर्वधर्म समभावाचा नारा दिला आहे, मात्र सर्वांना सामान न्याय न देता एका धर्माचे लांगुलचालन आणि दुसऱ्या धर्माचा दुस्वास हे काँग्रेसचे जुनेच धोरण राहिले आहे. भ्रस्टाचारमुक्त देश ही कॉंग्रेसची संकल्पना आहे, मात्र काँग्रेसच्याच नेत्यांनी लाखो करोडोचा भ्रष्टाचार केल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. असे अनेक भ्रष्टाचार काँग्रेसने नियमित देखील केले आहेत.
हे सर्व प्रकार बघून जनसामान्यांचा काँग्रेसवरून विश्वास उडाला हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवताना या विचारधारेचे आम्ही पालन करू हा विश्वास जनसामान्यांच्या मनात निर्माण करणे हे काँग्रेसजणांचे प्रथम कर्तव्य राहणार आहे. हा विश्वास निर्माण केला तर काँग्रेस पुन्हा जुने वैभव मिळवू शकेल.
मात्र आज काँग्रेसजन फक्त सत्ताधारी भाजपवर टीका करण्यात धन्यता मानतात, जेव्हा आपण समोरच्याला एक बोट दाखवतो तेव्हा स्वतःकडे तीन बोटे येतात हे विसरतो काँग्रेसचे नेमके हेच होते आहे. त्यामुळे भाजपवर टीका करण्यापेक्षा आधी काँग्रेसने स्वतः सुधारावे आणि मगच विचारधारा सर्वदूर पोहोचवण्याचा संकल्प करावा इतकेच इथे सुचवायचे आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply