अन्यथा महाराष्ट्रात उरला-सुरला भाजपादेखील नष्ट होईल – संजय राऊत यांचा जे. पी. नड्डा यांना इशारा

मुंबई : १२ नोव्हेंबर – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून टाका, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्र भाजपा नेते-पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरुन जे पी नड्डा यांना सल्ला देताना राज्यातील भाजपा नेत्यांच्या नादी लागू नका, अन्यथा महाराष्ट्रात उरला-सुरला भाजपादेखील नष्ट होईल असा इशारा पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. आम्ही पाहिला तो भाजपा आणि आत्ताचा भाजपा यात जमीन अस्मानचा फरक असल्याचंही म्हटलं.
“जे पी नड्डा यांना मी कायम एक संयमी आणि सुसंस्कृत नेते म्हणून पाहिलं आहे. त्यांच्या कानात भाजपाच्या काही कपटी, कारस्थानी लोकांनी काही सांगितलं असेल तर त्यांच्या नादी लागू नये. अन्यथा महाराष्ट्रात उरला-सुरला भाजपादेखील नष्ट होईल,” असं संजय राऊत म्हणाले.
भाजपाला आम्ही फार जवळून पाहिलं आहे. पण आम्ही तेव्हा पाहिलेला भाजपा आणि आत्ताचा भाजपा यांच्यात जमीन अस्मानचा फरक आहे. आत्ताच्या भाजपाला कट-कारस्थानाच्या कोणत्या भूताने झपाटलं आहे हे पहावं लागले. महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा असल्याने आता आम्हाला भुत उतरवणारी लोकं कुठे सापडत नाही. पण राज्यातील जनता २०२४ मध्ये यांच्या मानेवरील चढलेली भूतं खाली उतरवतील,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Leave a Reply