शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नाल्यात मगर आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण

नागपूर : ९ नोव्हेंबर – अंबाझरी, वायुसेनानगर, शिवणगाव यासह शहराच्या काही भागात बिबट्या शिरला होता. या बिबट्याची दहशत संपत नाही तोच शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या पत्रकार सहनिवास परिसरातील नाल्यात मगर आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धरमपेठेतील पत्रकार सहनिवासाला लागून असलेल्या नाल्यामध्ये मगर थोडी पाण्याच्या वर येऊन आराम करीत असताना काही स्थानिक मुलांना दिसली. त्यांनी तिचा व्हिडीओ काढून व्हायरल केला. काही दिवसांपूर्वी झालेल्या तुफानी पावसात वेणा नदीतून जुळलेल्या नाल्यातून मगर आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाल्यात मगर असल्याची तक्रार मिळाल्यानंतर वनविभागाचे पथक दोन-तीनदा घटनास्थळावर जाऊन आले. परंतु या पथकाला मगर आढळली नाही. दहा ते बारा दिवसांपूर्वी पत्रकार कॉलनीजवळील नाल्यात मगर असल्याचे आम्हाला कळले होते. त्यावेळी तपास करण्यात आला. मात्र, तेव्हा मगरीचा शोध लागला नव्हता. या नाल्यात मगर दिसल्याची माहिती मिळाली. वनविभागाच्या चमूने तेथे तीन ते चार तास तपास केला. मात्र, मगरीचा ठावठिकाणा लागला नाही. या नाल्यातून मगर बाहेर येण्याची शक्यता नसल्याने नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे नागपूरचे उपवनसंरक्षक हाडा यांनी सांगितले. तर मगर हा पाण्यात राहणारा प्राणी असल्याने शहरात येणे अशक्यच आहे. ज्याप्रमाणे बिबट आला आणि माघारी परतला, त्याचप्रमाणे मगरदेखील परतून जाईल, असे मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे यांनी नमूद केले.

Leave a Reply