गोंदियात नक्षल्यांनी पेरून ठेवलेले स्फोटक साहित्य व हत्यार जप्त

गोंदिया : ९ नोव्हेंबर – सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गडमाता मंदिर परिसरात पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी स्फोटक साहित्य व हत्यार पेरून ठेवले होते. याबाबतची गोपनीय माहिती नक्षल सेल गोंदियाला मिळाली. या माहितीवरुन पोलिस अधीक्षक विश्व पानसरे व उपविभागीय अधिकारी नालकुल यांच्या मार्गदर्शनात नक्षल सेल, बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने सदर साहित्य पोलिसांनी जप्त केले.
गोंदिया नक्षल सेलला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात नक्षल सेल गोंदिया, सी ६० पथक गोंदिया व सालेकसा पोलिस दल तसेच बॉम्ब नाशक पथक व श्वान पथकाच्या मदतीने सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत गडमाता परिसरात शोध घेण्यात आला. तेथे पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी गाडून ठेवलेले स्फोटक साहित्य, नक्षल साहित्य व काही हत्यार आढळले. यात ८० फुट वायर, ८ जिलेटीन काड्या, नॉनइलेक्ट्रिक डिटोनेटर, २ गावठी बंदूक, राऊंड-२, मेडिसीन बॉक्स, जुने पिस्टलसारखे दिसणारे २ शस्त्र, नक्षल गणवेश, इलेक्ट्रिक डिटोनेटर ११, प्रिंटेड सर्किट बोर्ड २, हिरव्या रंगाचे ओलसर स्फोटक पाऊडर ७०० ग्राम, जुने देशी कट्टे २, राखाडी रंगाचे स्फोटक सदृश्य पाऊडर ७०० ग्राम या साहित्यांचा समावेश आहे. हे साहित्य जप्त करून सालेकसा पोलीस ठाण्यात नक्षल्यांच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३०७, १२० सहकलम १३, १८, २०, २३, भारतीय स्फोटक पदार्थ कायदा ४-५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल करीत आहेत.

Leave a Reply