सरकार पाडू आणि सरकार पडेल याच कैचीत विरोधी पक्ष अडकून पडला आहे – संजय राऊत

मुंबई : ७ नोव्हेंबर – गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात घडणाऱ्या घडामोडींमुळे राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप आणि वाद होताना दिसत आहेत. आर्यन खान प्रकरण, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर अशा अनेक मुद्द्यांवरून हे आरोप होत असताना शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी या मुद्द्यांवरून विरोधकांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, विरोधकांच्या सरकार पाडू या दाव्यांची देखील त्यांनी खिल्ली उडवली.
भाजपाकडून सातत्याने राज्यातील सरकार पाडण्याविषयी केलेल्या दाव्यांवरून संजय राऊतांनी टीका केली आहे. सामनामधील आपल्या रोखठोक या सदरामधून संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “भाजपाला राज्यातलं सरकार कोणत्याही परिस्थितीत घालवायचंय. पण सरकार घालवण्याची ही कुठली अलोकशाही पद्धत? नागपुरातून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले ‘आठेक दिवसांत सरकार पाडू असं नागपुरातले भाजपावाले बोलतायत’. सरकार पाडू आणि सरकार पडेल या कैचीतच राज्यातला विरोधी पक्ष अडकून पडला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
अनिल देशमुख यांच्या अटकेवरून देखील संजय राऊतांनी भाजपाला सुनावले आहे. “हवेतल्या आरोपांवर केंद्रीय तपास यंत्रणा राज्याच्या गृहमंत्र्यांना अटक करते आणि पुढच्या २४ तासांत हेच परमबीर सिंग महाशय चांदिवाल आयोगासमोर सांगतात की अनिल देशमुखांविरोधात माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. आरोप करणारा फक्त पळूनच गेला नाही, तर त्यानं आरोपच नाकारले. देशमुख कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत आणि भाजपा त्याबद्दल जल्लोष करते. ही मनमानी, मस्तवालपणा आणि विकृत तानाशाही आहे”, असं या लेखात संजय राऊतांनी नमूद केलं आहे.
दरम्यान, राज्यात तुरुंगांचेच खासगीकरण झाले आहे का? असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. “आता रेल्वेपासून एअर इंडियापर्यंत सगळेच खासगी झाले. ईडी, सीबीआय, एनसीबी ज्या पद्धतीने काम करतंय, ते पाहाता त्यांचंच खासगीकरण झाल्याचं चित्र आहे. राज्यात याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू असं भाजपाचे नेते सांगतात तेव्हा देशातल्या तुरुंगांचेही खासगीकरण झाले काय असा प्रश्न पडतो. मोदी है तो मुमकीन है! हे अशा वेळी खरे वाटते”, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

Leave a Reply