रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून ६ तरुणांना घातला ४० लाखांचा गंडा

नागपूर : ७ नोव्हेंबर – रेल्वेत नोकरीचे आमिष देऊन ६ जणांची तब्बल ४0 लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी तीन आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार कवलजित गहरवाल, अजितकुमार ऊर्फ हितेश हेडाऊ, नीलेश दिलीप ठाकरे अशी आरोपींची नावे आहेत. सोनेगाव हद्दीतील पन्नासे ले-आऊटमधील अखिलेश संकुल येथील रहिवासी पृथ्वीराज रामनरेश पांडे (वय ३७) यांच्यासह आणखी पाच जणांना आरोपींनी रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. ही घटना २0 ऑक्टोबर २0१८ ते ५ नोव्हेंबर २0२१ च्या दरम्यानची आहे. या काळात आरोपींनी या सहा जणांकडून ४0 लाख रुपये घेतले. त्यानंतर टाळाटाळ करणे सुरू केले. पांडे यांच्यासह इतरांनी तगादा लावल्यानंतर आरोपींनी त्याला रेल्वे विभागाचे खोटे दस्ताऐवज देऊन अंग काढण्याचा प्रयत्न केला. ही सर्व कागदपत्रे घेऊन जेव्हा पांडे आणि इतर पाच जण नोकरीसाठी गेले तेव्हा त्यांना ते सर्व कागदपत्रे बनावटी असल्याचे कळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply