मोदींच्या वाढदिवसाला एक कोटींहून अधिक लसींचे डोस दिले जातात, मग रोज का नाही? – सोनिया गांधी

नवी दिल्ली : ३ नोव्हेंबर – देशात करोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहीमेवरून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर हल्लाबोल केला आहे. सोनिया गांधी एका लेखातून मोदी सरकारवर निशाणा साधत सवाल उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या एक कोटींहून अधिक लसींचे डोस दिले जातात. मग रोज इतके डोस का दिले जात नाही? असा प्रश्न सोनिया गांधींनी केला आहे. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेची तयारी सरकारने केली नव्हती, अशी टीकाही सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात छापून आलेल्या लेखातून केली आहे.
करोनाचे रुग्ण ऑक्सिजन अभावी तडफडत होते. त्यांच्या असाह्य कुटुंबीयांच्या वेदना सरकारने जाणून घेतल्याच नाही. यामुळे ते हे विसरणार नाहीत. करोनाविरोधी लढाईकडे मोदी सरकार इव्हेंट मॅनेजमेंटची संधी म्हणून का बघते? असा सवाल सोनिया गांधींनी केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला करोनावरील लसींचे १ कोटींहून अधिक डोस दिले जातात. मग रोज इतके डोक का देता येत नाहीत? आतापर्यंत लोकसंख्येच्या एक तृतीयांशपेक्षा कमी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तसंच मुलांच्या लसीकरणाच्या मुद्द्यावर सरकारची सध्या कोणतीही योजना दिसत नाहीए, अशी टीका सोनिया गांधींनी केली. करोना व्यवस्थापनावरून विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत.
सरीकडे, महागाईवरून राहुल गांधी आणि प्रियाका गांधी वाड्रा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. हा सणाचा काळ आहे. महागाईने जनता हैराण आहे. निवडणुकीत जनता माफ करणार नाही, असं प्रियांका गांधींनी ट्विटमध्ये म्हटलंय. ‘भाजप सरकारने सणापूर्वी महागाई कमी करण्याऐवजी गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, तेल, भाज्यांचे भाव गगनाला भिडले. निवडणुकीच्या वेळी भाजप १-२ रुपये कमी करून जनतेत जाईल. त्यावेळी चोख प्रत्युत्तर मिळेल. जनता माफ करणार नाही’, असं प्रियांका म्हणाल्या.

Leave a Reply