समीर वानखेडेंचा पेहराव व राहणीमान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढे – नवाब मलिक यांचा पुन्हा एक आरोप

मुंबई : २ नोव्हेंबर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे इतके प्रमाणिक अधिकारी आहे ती, त्यांचा पेहराव आणि राहणीमान जर पाहिलं तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींहून पुढे गेल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे. इतकच नाही तर समीर वानखेडे वापरत असलेले कपडे, शूज अन् घड्याळ किती महाग आहेत याबाबतही नवाब मलिकांनी खुलासा करत खळबळजनक आरोप केला आहे.
नवाब मलिक म्हणाले, तुम्ही समीर वानखेडेंचे सर्व फोटोज पाहा. शूज पाहा. दोन-दोन लाखांचे शूज वापरतात, शर्ट ज्याची किंमत ५० हजारांहून अधिक आहे असे शर्ट वापरतात. टी शर्ट तुम्ही पाहिले तर ज्याची किंमत ३० हजारांपासून सुरू होते. दररोज घड्याळ बदलतात मनगटावर लाखो रुपयांचे घड्याळ आहेत. २० लाखांपासून १ कोटी रुपयांचे घड्याळ आहेत. प्रामाणिक अधिकाऱ्याचे हे राहणीमान आहे. असं राहणीमान संपूर्ण देशातील नागरिकांचे व्हावे.
समीर वानखेडेंचा शर्ट ७० हजारांचा का असतो. दररोज नवनवीन कपडे का येतात? मोदी साहेबांहूनही पुढे गेले आहेत. पॅन्ट लाख रुपयांची, पट्टा दोन लाखांचा, शूज अडीच लाखांचे, घड्याळ ५० लाख रुपयांचे वापरतात. जे कपडे ते वापरतात त्याची एकूण किंमत करोडोंच्या घरात आहे. यापेक्षा अधिक प्रामाणिक कुणी असू शकत नाही जो लाखोंचे कपडे, शूज वापरतो असंही नवाब मलिक म्हणाले.
नवाब मलिकांनी पुढे म्हटलं, किरण गोसावी, भानुशाली, फ्लेचर पटेल, आदिल उस्मानी, सॅम डिझूझा, पठाण हे सर्व प्रायव्हेट आर्मीचे मेंबर आहेत. ही प्रायव्हेट आर्मी समीर वानखेडे चालवत आहेत. बॉलिवूड कलाकारांना अडकवून त्यांच्याकडून वसुली करण्यात आली आहे. अनेक निर्दोष लोकांना या प्रायव्हेट आर्मीने अडकवलं असून वसुली केली आहे.
एनसीबीचे अधिकारी व्ही व्ही सिंग सुद्धा या प्रकरणात सहभागी आहेत. माझ्या जावयाला ज्यावेळी अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याकडून लँडक्रुझरची मागणी करण्यात आली. जर माझ्या जावयासोबत लँडक्रुझरबाबत बोलत असतील तर काय सुरू होतं हे समोर येईल. जसजसा तपास पुढे जाईल सर्व प्रकरणांचा उलगडा होईल. भ्रष्ट अधिकारी म्हणून ज्याला बाजूला केलं होतं त्याला वानखेडेने पुन्हा या खेळात उतरवलं असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

Leave a Reply