सचिन वाझे महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात आल्यावरच अनिल देशमुखांनी मुहूर्त का काढला? – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : २ नोव्हेंबर – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या वसुली प्रकरणात काल रात्री उशीरापर्यंत चौकशी करुन मध्यरात्री अखेर अटक करण्यात आली. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आता भाजपा नेत्यांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. भाजपा नेते व राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला असून, “सचिन वाझे हे महाराष्ट्र पोलीस आणि एसआईटीच्या ताब्यात आल्यावरच अनिल देशमुखांनी ईडीच्या समोर जाण्याचा मुहूर्त का काढला..?” असा सवाल त्यांनी केला आहे.
ट्विटरवर सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये म्हटले आहे की, “खरं आहे देर आए दुरूस्त आए…ईडीच्या कार्यालयात आहा. एक गृहमंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारीचा निर्वाह केला, त्यांनी एक आदर्श प्रस्थापित करायला हवा होता. अनिल देशमुख नेहमी पोलीस अधिकाऱ्यांसोबत किंवा जनतेसोबत संवाद साधताना सागंयाचे, की पोलिसांनी एखादा खोटा गुन्हा दाखल केला तर त्या संदर्भात आपली बाजू मांडलीच पाहिजे. कायद्या तुमच्या बाजूने उभा आहे. मग जे वाक्य अनिल देशमुख दुसऱ्यांना सांगायचे, आज असं अचानक काय झालं? त्याची दोनच कारणं असू शकतात. एक कारण, की अनिल देशमुख यांच्या हे लक्षात आलं की कोर्टातून देखील आपल्याला या संदर्भात अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही. दुसरा मुद्दा यामध्ये संपत्ती जी आहे, त्या संपत्तीवर टाच येत आहे.”
तसेच, “तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे. ज्या मुद्द्यासंदर्भात मी लक्ष वेधू इच्छितो की सचिन वाझे आता महाराष्ट्राच्या एसआयटीच्या सुपूर्द झाला आहे. कदाचित अनिल देशमुखांना असं वाटत असेल, आता सचिन वाझे आपण सांगू त्या पद्धतीने एसआयटी त्याच्याकडून वदवून घेईल आणि म्हणून आता मी जर ईडीच्या समोर गेलो तर आता धोका नाही. हे असण्याची शक्यता आहे. मी असं म्हणणार नाही हेच आहे, पण असं असण्याची देखील शक्यता आहे. असा मुहूर्त का काढला? सचिन वाझे महाराष्ट्र पोलीस व एसआयटीच्या ताब्यात आल्याबरोबर अनिल देशमुख हे ईडीच्या समोर आले. इतक्या दिवस कुठं होते? याचं उत्तर शेवटी अनिल देशमुख यांनी दिलं पाहिजे.” असं देखील मुनगंटीवार यांनी बोलून दाखवलं.
याचबरोबर,“माझ्या या प्रमुख दोन शंका आहे. एक त्यांच्या हे लक्षात आलं की आपली ही अटक आता थांबवता येत नाही. दुसरं ही योग्य संधी आहे. सचिन वाझे आता महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात आहे.” असंही मुनगंटीवार शेवटी म्हणाले आहेत.

Leave a Reply