समीर वानखेडेंनी दिल्लीत घेतली मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट

नवी दिल्ली : १ नोव्हेंबर – मुंबई ड्रग्स प्रकरणी आर्यन खानच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच ठेवलीय. वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. बनावट कागदपत्र देत त्यांनी नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर वानखेडे यांनी आज दिल्लीत मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सांपला यांना आपली सगळी कागदपत्र दाखवली आहेत.
समीर वानखेडे यांनी आज मागासवर्ग आयोगासमोर आपले सर्व कागदपत्र ठेवले. त्याचबरोबर त्यांनी आपली तक्रारही दाखल केली आहे. आयोगाकडून पुरावे आणि कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. त्याची पूर्तता केली आहे. आता माझ्या तक्रारीची सत्यता पडताळली जाईल आणि मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष लवकरच त्यावर उत्तर देतील असं समीर वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांनी सांगितलं की, आम्ही महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडून एक रिपोर्ट मागितला होता. पण अद्याप रिपोर्ट आला नाही. वानखेडे आपली बाजू मांडण्यासाठी आले होते. ते महार जातीशी संबंधित आहेत. त्याच आधारावर त्यांना नोकरी मिळाली आहे. ते अनुसूचित जातीशी संबंधित आहेत. त्याबाबतचे कागदपत्र आम्ही मुंबई मधून राज्य सरकारकडून मागवणार आहोत.
एक अधिकारी आपलं काम करत आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री त्या अधिकाऱ्यावर व्यक्तिगत आरोप करत आहे. अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहे. यामागे कारण काय? त्याची चौकशी झाली पाहिजे, असं राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी म्हटलंय. समीर वानखेडे यांनी दोन दिवसांपूर्वी अरुण हलदर यांची भेट घेतली होती. त्यावेळी वानखेडे यांनी आपल्याकडील कागदपत्रे हलदर यांना दाखवली होती. त्यानंतर काल हलदर यांनी वानखेडे यांच्या परिवाराचीही भेट घेतली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply