वीजबिलाच्या थकबाकीची गेलेल्या पथकावर हल्ला करणाऱ्या मायलेकांवर गुन्हा दाखल

नागपूर : १ नोव्हेंबर – वीजबिलाच्या थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला व शिवीगाळ करणाऱ्या वीजग्राहक महिला तसेच तिच्या मुलावर अजनी पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
मानेवाडा उपविभागांतर्गत भगवाननगर भागात वीजबिल वसुलीसाठी महावितरणचे सुधीर चौधरी, सुधीर जंजाळ, प्रदीप टेंभुर्णे, विनोद लोहकरे, राहुल वैरागडे, विक्रांत वाटकर, हेमलता राऊत व कोमल पाटील हे कर्मचारी शनिवारी गेले होते. कुकडे लेआउट येथे प्लॉट क्रमांक १०६ येथील रहिवासी कमाबाई शंकर बैस यांच्याकडे ४ हजार ६७५ रुपये एवढ्या वीजबिलाची थकबाकी होती. तसेच त्यांचे नाव जानेवारी २०२०पासून थकबाकीदारांच्या यादीत आहे. तसेच थकबाकी भरण्याबाबत संबंधित ग्राहकाला ११ ऑगस्ट, ११ सप्टेंबर व १२ ऑक्टोबरपर्यंत वीजबिलाची थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असा एसएमएस देण्यात आला होता. तरीही ग्राहकाने थकबाकी न भरल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली. यावेळी बैस याच्या मुलाने या कारवाईत अडथळा आणला. लोखंडी रोडने सुधीर जंजाळ व सुधीर चौधरी यांच्यावर हल्ला केला. जिवे मारण्याची धमकीही दिली. तसेच महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली व धमकी दिली.
या घटनेची माहिती मिळताच नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके व नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांनी महावितरणच्या पथकाची त्वरित भेट घेत या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासित केले. यावेळी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झोन चारचे पोलिस उपायुक्त नुरुल हसन यांची भेट घेऊन आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. यानुसार सुधीर चौधरी यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी कमाबाई बैस व तिच्या मुलावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

Leave a Reply