राजकारणासाठी पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करतात, भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे – संजय राऊत

मुंबई : १ नोव्हेंबर – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अनुषंगाने काही आरोप केले आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. हमाम में सब नंगे है. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. आमच्याही हातात दगड असू शकतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला
संजय राऊत मीडियाशी बोलताना ही टीका केली. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे. एकमेकांवर आरोप करणं सुरू आहे, एकमेकांना खोट्या आरोपात फसवणं सुरू आहे, केंद्रीय चौकशी समितीचा गैरवापर करणं सुरू आहे, पूर्वी असं कधी घडलं नाही. आता दोन वर्षात हे सुरू झालंय. हे महाराष्ट्राचं राजकारण नाही. आता यात शरद पवारांनाही घुसडले आहे. भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. आपल्या राजकारणासाठी पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करत आहेत, असं राऊत म्हणाले.
राजकारण म्हटलं तर हमाम में सब नंगे होते है. मलिक यांनी काही पुरावे दिले आहेत. विरोधकांना सांगतो. ज्यांचे घर काचेचे असते त्यांनी इतरांवर दगडफेक करू नये. आमच्याही हातात एक दगड असू शकतो. आम्ही तुमच्या एवढे खाली येणार नाही. आम्ही कमरेखालचा वार केला नाही. पवारांनी संस्कार असलेलं राजकारण केलं आहे, असं राऊत म्हणाले.
भाजपने शरद पवारांवर घाणेरड्या पद्धतीने टीका केली आहे. ते त्यांचं अधिकृत मत आहे का याचा भाजपने खुलासा करावा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांनी त्यावर बोलावं शरद पवार गेल्या ५० वर्षापासून संसदीय राजकारणात आहेत. त्यांच्यावर असे आरोप करणं चुकीचं आहे, असं राऊत म्हणाले.
दरम्यान, नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांवर बोलण्यास त्यांनी नकार दिला. मलिकांची माहिती धक्कादायक आहे. ज्यांच्यावर आरोप झाले ते खुलासा करतील. मला माहीत नाही. एनसीबीने चौकशी करावी. पुरावे असतील तर द्यावेत. पण महाराष्ट्रात चिखलफेक करू नये, असं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply