अखेर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर – व्हिडीओ जारी करत फेटाळले सर्व आरोप

मुंबई : १ नोव्हेंबर – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडीसमोर हजर झाले आहेत. सोमवारी सकाळी अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर झाले. देशमुख यांच्या वकिलांनी याची माहिती दिली. दरम्यान, यावेळी देशमुख यांनी एक व्हिडिओ जारी करून पुन्हा एकदा त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
मला ईडीचे समन्स आले तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा चूकीच्या बातम्या माध्यमांमध्ये दिल्या गेल्या. जेव्हा जेव्हा ईडीने मला समन्स बजावले तेव्हा मी त्यांना कळविले की माझी कोर्टात केस सुरू आहे. त्याची सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या कार्यालयात येईल असे मी त्यांना कळविले. जेव्हा ईडीने आमच्या घरी धाड टाकली. तेव्हा आम्ही सर्वांनी आम्ही त्याला सहकार्य केले. सीबीआयच्या समन्सलाही मी स्वतः हजर होऊन उत्तर दिले. अजूनही माझ्या केसवर सुनावणी सुरू आहे असे देशमुख म्हणाले.
परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आणि ते स्वतःच गायब आहेत असेही देशमुख यांनी म्हटले आहे. ते कुठेतरी परदेशात असल्याची आता माहिती येत आहे असे म्हणत सिंग यांच्यावरही देशमुख यांनी निशाणा साधला.
१०० कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपांवरून ईडीने अनिल देशमुख यांना वारंवार समन्स बजावलं होतं. मात्र, ते ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यांची ५ कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात वॉरंटही जारी करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यानं खेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या, मात्र तरीही देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते.

Leave a Reply