नवाब मलिकांचे सर्व दावे आणि पुरावे खोटे – क्रांती रेडकर

मुंबई : ३१ ऑक्टोबर – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे खूप मोठे नेते आहेत. ते रोज नवा आरोप करत आहेत. काही कागदपत्रंही दाखवत आहेत. मात्र, त्यांचे सर्व दावे आणि पुरावे खोटे आहेत. त्यात काही तथ्य नाही, असा दावा अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केला आहे.
क्रांती रेडकर यांनी सासरे ज्ञानदेव वानखेडे यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. रामदास आठवले आम्हाला भेटले हे कुणाला दुर्देवाचं वाटत असेल तर आम्ही जायचं कुठे? एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठी उभं राहणं चुकीचं आहे का? आम्ही आठवलेंना सर्व कागदपत्रं दिली आहेत. नवाब मलिक मीडियासमोर काही कागदपत्रं दाखवत असतील आणि तुम्ही तेच सत्य मानत असाल तर कृपया डोळे उघडा. माझी हातजोडून विनंती आहे, असं क्रांती म्हणाली.
वानखेडे फ्रॉड नाही
नवाब मलिक मोठे नेते आहेत. आमच्याही पाठी मोठा नेता आहे. आम्ही त्यांच्या मदतीने तुम्हाला पुरावा देणार आहोत. त्यामुळे समीर वानखेडे फ्रॉड आहेत की नवाब मलिक आहेत हे दिसून येईल, असं सांगतानाच आठवले आमच्यासोबत आहे. ते दलितांच्या पाठी खंबीरपणे उभे राहतात. आम्ही आठवलेंना सर्व माहिती दिली आहे. त्यांना पूर्ण पुरावे दिले आहेत. त्यामुळे त्यांचा आमच्यावर विश्वास बसला. नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे ठरले आहेत. कास्ट सर्टिफिकेटपासून मॅरेज सर्टिफिकेटपासून त्यांचे सर्व दावे फोल ठरले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी ज्ञानदेव वानखेडे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी जन्मल्यापासून शाळेच्या दाखल्यापर्यंत एनसीसी आणि सर्व्हिसला लागल्यापासूनचे सर्व कागदपत्रं आमच्याकडे आहेत. मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी महार जातीतील आहे. मी मुस्लिम महिलेशी 1978मध्ये लग्न केलं आहे. मी हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे. समीर आणि मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी आंबेडकरवादी, जयभीमवाला आहे. महार जातीचा आहे. मला त्याचा मला अभिमान आहे. आमच्यावरील खासगी आरोप थांबवा. प्रश्न फक्त ड्रग्जचा आहे. तुमच्या जावयाला अटक केल्यामुळे आम्हाला बदनाम करू नये. तुम्ही कोर्टात जावं आमची बदनामी करू नका, असं त्यांनी सांगितलं.
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच इथपर्यंत आलो आहे. माझा मुलगाही आला आहे. आम्ही दलितांचे हक्क हिरावले नाही. मी आंबेडकरवादी आहे. तुम्ही आमच्यावर निराधार आरोप करू नका, असं आवाहन करतानाच वानखेडे यांनी सर्व कागदपत्रेच मीडियासमोर सादर केले.

Leave a Reply