संपादकीय संवाद – मराठी संवर्धनासाठी राज्यपालांनी दिलेल्या हाकेला आपण प्रतिसाद द्यायलाच हवा

महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये मराठीचा वापर व्हावा आणि कृषी तसेच तंत्रज्ञान असे विषय मराठी मातृभाषेतून शिकविले जावे, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात बोलतांना राज्यपालांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
तसे बघता भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंड परिसरातून आले आहेत, तिथली मातृभाषा हिंदी आहे, मात्र जिथे आपण राज्यपाल म्हणून पद भूषवितो तिथल्या मातृभाषेबद्दल आस्था बाळगणे हा त्यांचा विचार निश्चितच अभिनंदनीय म्हणावा लागेल. महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी मसरातही शिकायला सुरुवात केली, राज्यपाल कार्यालयातील एका मराठी उपसचिवांच्या शिक्षिका असलेल्या पत्नीची त्यांनी रीतसर शिकवणीच लावली, आणि मराठीचा अभ्यास सुरु केला. आज ते कसमापुरते मराठीचे वाचनही करतात्त आणि प्रसंगी थोडेफार मराठी बोलूनही जातात. प्रस्तुत लेखकाच्या दोन मराठी पुस्तकांचे गतवर्षी राज्यपाल महोदयांनी प्रकाशन केले त्यावेळी त्यांनी दोन्ही पुस्तके वाचून त्यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले होते, हे बघता त्यांचा मराठीबद्दलचा जिव्हाळा स्पष्ट दिसून येतो.
याच समारंभात त्यांनी दीक्षांत समारोहात वापरल्या जाणाऱ्या गाऊन या प्रकाराबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे, त्यांची ही नाराजी रास्तही म्हणावी लागेल, आपल्या देशात विद्यापीठांमध्ये दीक्षांत समारोहाचे प्रथा इंग्रजांच्या काळात सुरु झाली, त्याकाळात इंग्रजी विद्यापीठांच्या दीक्षांत समारोहात अश्या प्रकारचे गाऊन वापरण्याची पद्धत होती, देशातून इंग्रज गेले तरीही त्यांनी सुरु केलेल्या प्रथा, परंपरा तश्याच कायम राहिल्या. नाही म्हणायला नागपूर विद्यापीठासारख्या काही विद्यापीठांनी या इंग्रजी प्रथांना रामराम ठोकला, गेल्या जवळ जवळ ६० वर्षांपासून नागपूर विद्यापीठात गाऊन ऐवजी वेगवेगळ्या रंगाचे उपरणे पांघरायला दिले जाते. फक्त पदविकांक्षी विद्यार्थीच नाही, तर पदवी देणारे सर्व अधिष्ठाता, कुलगुरू, कुलपती आणि प्रमुख अतिथी हेदेखील अश्या प्रकारचे उत्तरियचं पांघरतात. वेगवेगळ्या समारंभात सन्मान म्हणून खांद्यावर उपरणे टाकण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे, ही प्रथाच नागपूर विद्यापीठाने लागू केली आहे, मात्र नागपूर विद्यापीठ सोडले तर इतर विद्यापीठांनी अजूनही जुने इंग्रजाळलेले गाउनच वापरणे सुरु ठेवले आहे. ही प्रथा आता बंद व्हायला हवी ही राज्यपालांची सूचना निश्चितच स्वीकारली जायला हवी.
कोणतेही शिक्षण हे मातृभाषेत घेतले तर ते केव्हाही चांगले असते, मातृभाषेत जे शिकतो ते कंठस्थ करायला सोपे जाते. मातृभाषेत ऐकलेले सहज पाठ होऊन जाते, त्यामुळे शिक्षण हे मातृभाषेतच व्हावे ही अपेक्षा केव्हाही चांगली म्हणावी लागेल.
भारतात विभिन्न राज्यांमध्ये वेगवेगळ्या मातृभाषा आहेत, या मातृभाषा त्या त्या परिसरात प्रामुख्याने बोलावल्या जातात. महाराष्ट्रात मात्र तसे होत नाही, विभिन्न प्रांतातील नागरिकांनी महाराष्ट्रात गर्दी केलेली आहे, महाराष्ट्राची संस्कृती सर्वसमावेशक आणि सहिष्णू आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी आपली भाषा जपण्यापेक्षा इतरांच्या भाषा आत्मसात करायला सुरुवात केली, परिणामी मराठीची महाराष्ट्रातच दुर्दशा आहे. काही वर्षांपूर्वी ख्यातनाम साहित्यिक कुसुमाग्रज यांनी मराठी ही मंत्रालयासमोर लक्तरे पांघरून उभी आहे, अश्या शब्दात मराठीच्या दुर्दशेचे वर्णन केले होते, ते रास्तच म्हणावे लागेल, त्यांनी हे वर्णन करून आता जवळ जवळ तीन दशके लोटली आहेत, मात्र मराठीची दुर्दशा तशीच आहे.
अश्यावेळी राज्यपाल भागस्तसिंह कोश्यारी यांच्यासारखे महामहिम मराठीच्या संवर्धनासाठी आणि जोपासनेसाठी पाऊले उचलतात तेव्हा प्रत्येक मराठीप्रेमी माणूस कुठेतरी सुखावतो. राज्यपालांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक मरष्ठीप्रेमी नागरिकांनी मराठीच्या संवर्धनासाठी कटिबद्ध व्हायला हवे. राज्यपालांनीच मराठी संवर्धनासाठी हाक दिली आहे, तिला आपण प्रतिसाद द्यायलाच हवा.

अविनाश पाठक

Leave a Reply