नागपुरात डोक्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करून केली एकाची हत्या

नागपूर : २९ ऑक्टोबर – नागपुरात गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता नागपुरात पुन्हा एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नागपुरातील महाल भागातील टाऊन हॉल जवळ नर्सिंग टॉकीज समोर तरुणाची हत्या करण्यात आली आहे. डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन ही हत्या करण्यात आली आहे. वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे तेथून हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे. नागपुरातील कोतवाली पोलीस स्टेशन पासून २०० मीटर अंतरावर ही हत्या झाली आहे. यामुळे नागपुरातील कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर अशा प्रकारची घटना घडत असेल तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान हा मृतक तरुण कोण आहे याची माहिती मिळू शकलेली नाहीये. त्यासोबतच या तरुणाची कोणी आणि का हत्या केली याबाबतही अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply