नागपुरातही एसटी कर्मचाऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर : २९ ऑक्टोबर – अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एसटी आगारात चालकानं आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच नागपूर येथेही एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
राज्यात काल पासून एसटी कर्मचाऱ्याने संपाचे हत्यार उपसले आहे. कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांना घेऊन आंदोलन सुरू केलं आहे. मात्र, आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक चिघळण्याची शक्यता आहे. नागपूरमध्येही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
नागपूर येथील गणेश पेठ बसस्थानकावर चालकाने विजेच्या खांबावर चढून तेथून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कमलेश ठाकरे असं या चालकाचे नाव आहे.
ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर इतर सहकाऱ्यांनी त्याला समजावून खाली उतरवले. त्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सकाळी ९च्या सुमारास ही घटना घडली आहे. मागण्या मान्य झाल्या असल्या तरी एसटी कर्मचारी आर्थिक संकटात असल्याने ठाकरे यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे समजते.

Leave a Reply