आत्महत्या करीत असल्याचा ऑडिओ व्हायरल झालेल्या अधिकाऱ्याचा रस्ते अपघातात मृत्यू

अमरावती : २९ ऑक्टोबर – मला मुक्तता द्या, मी आत्महत्या करत आहे, अशी उपजिल्हाधिकारी राम लंके यांना विनंती करणारा एका अधिकाऱ्याची ओडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अधिकाऱ्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. प्रमोद निंबोरकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते तिवसा पंचायत समितीमध्ये रोजगार हमी योजना विभागात कंत्राटी म्हणून कार्यरत होते.
कार्यमुक्त केल्याने आत्महत्या करत असल्याचे तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबोरकर यांनी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना फोनवरून सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या अधिकाऱ्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र, हा अपघात की तणावाखाली येऊन आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. मृत्यूपूर्वी प्रमोद निंबोरकर यांनी उपजिल्हाधिकारी राम लंके यांना फोन करून आपली व्यथा मांडली होती. आपल्याला तिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव हे सिंचन विहिरीच्या प्रत्येक फाईलमागे पाच हजार रुपये गोळा करण्यास सांगत असल्याचा गंभीर आरोपदेखील प्रमोद निंबोरकर यांनी केला होता. उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्याशी फोन वर रडत-रडत व्यथा सांगितल्याच्या ओडिओ क्लिपमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अमरावतीच्या वरुड तालुक्यातील प्रमोद भिमरावजी निंबोरकर हे पंचायत समिती तिवसा येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागात तांत्रिक अधिकारी म्हणुन कार्यरत होते. दरम्यानच्या काळात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाॅ. चेतन जाधव यांनी प्रमोद निंबोरकर यांच्या कार्यमुक्तीचा प्रस्ताव रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राम लंके यांना पाठविला होता. उपजिल्हाधिकारी राम लंके यांनीही कुठलीही शहानीशा न करता व बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा दावा निंबोरकर यांनी केला होता. वरुडच्या बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत मोर्शि ते वरुड रोडवर प्रमोद निंबोरकर यांचा रात्री अपघात झाला आहे. दरम्यान निंबोरकर यांच्या मृत्यूने अपघात की आत्महत्या ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply