समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक – किरीट सोमय्या

मुंबई : २८ ऑक्टोबर – एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजप नेत्यांकडून मलिकांसह महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली जातेय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरुनच नवाब मलिक समीर वानखेडे यांच्या कुटुबियांची माहिती काढत आहेत. समीर वानखेडे यांच्या पत्नीशी माझं बोलणं झालं आहे. ते आणि त्यांचे सासरे मला भेटायला येणार असल्याची माहितीही सोमय्या यांनी दिलीय.
जात काढली जाते, बाप काढला जातो, हे साफ चुकीचं आहे. ठाकरे सरकार चुकीचं वागतंय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना हे शोभत नाही. मलिक ज्या प्रकारे चिखलफेक करत आहेत, ते साफ चुकीचं आहे. मलिकांनी कोर्टात जावं. कोर्ट काय तो निर्णय घेईल. दिशाभूल का करताय? तुमचे घोटाळे बाहेर काढले त्यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी समीर वानखेडेंना टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केलाय.
आम्ही घोटाळेबाजांना सोडणार नाही. आयकर विभागाला अनेक गोष्टी सापडल्या आहेत. ईडीही मागे लागलीय. लातूरनंतर नांदेडचा विषय पुढे जाणार. नांदेडला अशोक चव्हाण यांनी साखर कारखाने हडपले आहेत. आम्ही ईडीकडे जाणार आणि तक्रार दाखल करणार, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.
समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. एका अधिकाऱ्याची जात काढली जाते, त्याचा बायकोची इज्जत काढली जाते, अशा शब्दात सोमय्या यांनी ठाकरे आणि पवारांवर निशाणा साधलाय. तसंच महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे दाबण्यासाठीच समीर वानखेडे प्रकरणाची चर्चा सुरु आहे. गेली १२ दिवस झाले समीर वानखेडे दलित की मुस्लिम हा वाद सुरु आहे. अजित पवारांवर ११ दिवस धाडी सुरु होत्या. त्यांना वाचवण्यासाठीच हे प्रकरण सुरु करण्यात आलं. ही सगळी ठाकरे सरकारची बदमाशी सुरु आहे. शरद पवार यांनी स्पष्ट केलं की अजित पवारांकडे चिल्लर सापडली. पण बिल्डरकडे १८० कोटी सापडले, त्याच बिल्डरने अजित पवारांना १०० कोटी रुपये दिले आहेत. अजित पवारांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. अजित पवार सिंचन घोटाळ्यात आरोपी आहेत. चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आहे. त्यावरील कारवाई या सरकारने थांबवली आहे, अशी टीका सोमय्या यांनी केलीय.
सिंचन घोटाळ्याची चर्चा, स्वतःचे घोटाळे दाबण्यासाठी लक्ष विचलीत करण्याचं काम सुरु आहे. त्यात जर काही घोटाळा असेल तर मग कारवाई करा. नारायण राणेंचा बंगला अनधिकृत असल्याचं सांगता मग तुम्ही कारवाई का करत नाही. संजय राऊथ यांचं पत्र मी रद्दीत टाकलं आहे. मी त्या पत्राला दमडीचीही किंमत देत नाही. 31 डिसेंबरपर्यंत अलीबाबा आणि चाळीस चोरांचे घोटाळे काढणार. उद्धव ठाकरे यांनी कितीही ट्रिक काढल्या तरी घोटाळेबाज सुटणार नाहीत, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.

Leave a Reply