संपादकीय संवाद – प्रशांत किशोर यांचे भाकीत नाकारता येणार नाही

भारतात पुढची अनेक दशके काँग्रेसला भारतीय जनता पक्षाशी संघर्ष करावा लागणार आहे, आणि भाजपचे वर्चस्व देशाच्या राजकारणावर कायम राहणार आहे, असे भाकीत ख्यातनाम रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केले असल्याचे वृत्त आहे. राहुल गांधी यांचा समज आहे की मोदी असेपर्यंतच भाजप सत्तेत राहील मात्र तसे नसल्याचे सांगत मोदीनंतरही भाजप सत्तेत प्रभाव टाकत राहील असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
प्रशांत किशोर हे ज्येष्ठ निवडणूक रणनीतीकार म्हणून विख्यात आहेत, २०१४ मध्ये केंद्रात भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यात प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा सिंहाचा वाटा होता, नंतर ते भाजपपासून दूर झाले मध्यंतरी ते काँग्रेसवाशी होणार अश्या जोरदार चर्चा सुरु होत्या, त्याचसोबत भाजपविरोधकांची एकत्र मोट बांधण्याच्या प्रयत्नात देखील ते आहेत, असेही बोलले जात होते. नुकत्याच पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसचे निवडणूक व्यवस्थापन त्यांनी सांभाळले आणि तृणमूलला विजयही मिळवून दिला होता. त्यांच्या या निष्कर्षाला त्यामुळेच विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
१९८४ साली फक्त २ खासदार घेऊन लोकसभेत पोहोचलेल्या भारतीय जनता पक्षाला २०१४ मध्ये केंद्रात स्पष्ट बहुमत मिळवून देण्यात नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्वाचा सिंहाचा वाटा राहिला आहे, हे कुणीहि नाकारणार नाही. त्याआधी जवळजवळ १० वर्ष मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या कार्यकाळात झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भाजपला घसघशीत यश मिळाले आहे. २०१४ मध्ये पक्षाने जेव्हा मोदींचे नाव पंतप्रधानपदासाठी निश्चित केले, तेव्हाही पक्षाची स्थिती अगदीच दुर्लक्षणीजोगी नव्हती हे नमूद करावे लागेल, या आधीही १९९८ आणि १९९९ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून भाजप सत्तेत आलाच होता, २००४ आणि २००९ मध्ये भाजप सत्तेत नसला तरी देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून भाजपचे स्थान होते, हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर भाजपची ताकद ही फक्त व्यक्तिकेंद्रित नव्हती हा निष्कर्ष निश्चित काढता येतो.
भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. संघात व्यक्तीपेक्षा संघटना आणि विचारांना महत्व दिले जाते, त्यामुळे विचारांची बांधिलकी असणारे अनेक नेते घावण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केले आहे. राजकारणात येण्यापूर्वी नरेंद्र मोदी हेदेखील संघाचे प्रचारकच होते, यावरून नेमके वास्तव लक्षात येऊ शकते. अश्या परिस्थितीत फक्त मोदींच्या जोरावर भाजपची सत्ता टिकली आहे, असे राहुल गांधींनी समजणे धाडसाचेच ठरते.
आधी नमूद केल्याप्रमाणे भाजप हा संघातील समर्पित कार्यकर्त्यांच्या मदतीने उभा झालेला पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज ९ दशकांपेक्षा जास्त कालखंडाची परंपरा आहे. १९२५ साली संघाची स्थापना झाली, आज देशाच्या प्रत्येक क्षेत्रात संघ पोहोचला आहे. विशेष म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात देशात ज्या-ज्या राजकीय आणि सामाजिक विचारधारा पुढे आल्या त्या बहुतेक सर्व काळाच्या ओघात अस्तंगत झालेल्या आहेत. त्यावेळी संघ विचारधारा हीच टिकलेली विचारधारा आहे, आणि फक्त टिकलीच नाही तर फोफावलीसुद्धा आहे. ही विचारधारा आणि या विचारधारेतून उभ्या झालेल्या संघटना आज भाजपच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत, त्यामुळे पुढील काही दशके भाजपचे भारतीय राजकारणावर वर्चस्व राहील, हे प्रशांत किशोर यांचे भाकीत नाकारता येत नाही.
२०१४ मध्ये मोदी सत्तेत आले, नंतरच्या ५ वर्षात त्यांनी जी काही कामे केली त्यामुळे जनसामान्य सुखावला त्याचाच प्रभाव २०१९ मध्ये दिसून आला, २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये भाजपला अधिक लक्षणीय यश मिळाले. नंतरच्या काळात मोदींनी जे काही चांगले करण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रभाव भारतीय राजकारणावर दीर्घकाळ राहणार आहे, हे निश्चित. आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, मात्र त्यांची वाटचाल ही संघाच्या विचारधारेवरच सुरु आहे, काळांतसाराने मोदी बाजूला होतीलही, मात्र संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्यांचा संच भाजपसोबत आहे, त्यातील कुणीतरी समोर येईल आणि भाजपला तसेच देशाला नेतृत्व देईल हे निश्चित. त्यामुळे आगामी काही दशके तरी भाजपचे देशाच्या राजकारणावर वर्चस्व राहील या प्रशांत किशोर यांच्या निष्कर्षामधील वास्तव नाकारता येणार नाही, हे नक्की.

अविनाश पाठक

Leave a Reply