आमच्यासोबत योग्य तो न्याय करा – क्रांती रेडकर यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना मागणी

मुंबई : २८ ऑक्टोबर – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबावर होत असलेल्या आरोपांमुळं त्रस्त झालेली त्यांची पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर हिनं आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ‘आमच्यासोबत योग्य तो न्याय करा,’ अशी मागणी क्रांतीनं मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.
आर्यन खान प्रकरण बनावट असून बॉलिवूडवाल्यांकडून खंडणी उकळण्यासाठी रचण्यात आलेलं कुभांड आहे. समीर वानखेडे याचे सूत्रधार आहेत, असा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. वानखेडे यांनी आतापर्यंत काय-काय केलं हे सांगण्यासाठी नवाब मलिक रोजच्या रोज काही ना काही कागदपत्रे व फोटो प्रसिद्ध करत आहेत. वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी जात व धर्म बदलल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. क्रांती रेडकर हिनं मीडियाच्या माध्यमातून मलिक यांचे आरोप खोडून काढले आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळं वैतागलेल्या क्रांती रेडकर हिनं आता मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात क्रांती रेडकर म्हणते…
‘माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणापासून मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करू नये हे त्या दोघांनी शिकवलं. तोच धडा घेऊन मी आज माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरुद्ध उभी आहे. लढते आहे. सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघत आहेत. मी एक कलाकार आहे. राजकारण मला कळत नाही आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रुची लख्तरं चारचौघात उधळली जात आहेत. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रिच्या प्रतिष्ठेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे.
आज बाळासाहेब असते तर त्यांना नक्कीच हे पटलं नसतं. आज ते नाहीत पण तुम्ही आहात. त्यांची सावली, त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचं नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाहीत याची मला खात्री आहे. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती.’

Leave a Reply