अकोल्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून ५० लाखांचा गुटखा जप्त

अकोला : २८ ऑक्टोबर – अमरावती परिमंडळाचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पथकाने जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे एका गोदामावर छापा मारून ४० लाखांचा गुटख्याचा साठा जप्त केला होता. या कारवाईनंतर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या कारवाईत तब्बल ५० लाख ७९ हजार ७९० रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी परिसरात छापा टाकून ४४ लाख ३४ हजार ७५० रुपयांचा तर दुसर्या कारवाईत कौलखेड परिसरात ६ लाख ४५ हजार ३४० रुपयांचा अवैध गुटखा साठा जप्त केला.या छाप्याने त्या भागात एकच खळबळ उडाली आहे.
एमआयडीसी क्र. ३ येथे गंगानगर येथील रहिवासी जावेद याच्या मालकीचा साहिल पीव्हीसी पाईप ग्राँईंडींग कारखाना असून या कारखान्याच्या मागील बाजूस अग्रवाल यांच्या मालकीचे टीनाचे गोदाम आहे. या गोदामामध्ये वाहीद खान याने प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू अवैध रीत्या विक्रीसाठी साठवून ठेवला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीवरून सहायक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या पथकाने येथे छापा मारला. त्यावेळी विविध कंपन्यांचा तब्बल ४४ लाख ३४ हजार ७५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळला. पोलिसांनी हा सर्व गुटखा जप्त केला असून वाहीद खान आणि गोदाम मालक अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.तथापि हे दोन्ही गुटखा तस्करा व आरोपी कारवाईनंतर फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कौलखेड येथील ज्ञानेश्वर उर्फ बाबू मारोती पोहरे याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटखा विक्रीकरिता साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती गोपीलाल मावळे यांना मिळाली. या माहितीवरून सहायक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी कारवाई केली असता त्या गोदाममध्ये ६ लाख ४५ हजार ३४० रुपयांचा गुटख्याचा साठा आढळला. हा साठा रामा शेवाळे यांचा असल्याचे पोलिस चौकशीत आढळले. पोलिसांनी रामा शेवाळे आणि ज्ञानेश्वर उर्फ बाबू मारोती पोहरे यांच्याविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून ज्ञानेश्वर पोहरे यास अटक करण्यात आली तर रामा शेवाळे हा फरार झाला आहे. पोलिसांच्या धडक कारवाईत दिवाळीपूर्वीच गुटखा माफियांचे ‘दिवाळे’ निघाल्याची चर्चा आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या दोन कारवाईत ५० लाख ७९ हजार ७९० रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला. मात्र अमरावती परिमंडळाचे विशेष महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर लगेच झालेल्या या कारवाईची चर्चा नागरिकांमध्ये होती.

Leave a Reply