स्टार बस आणि व्हॅनच्या धडकेत ४ जण जखमी

नागपूर : २७ ऑक्टोबर – नागपूर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत स्टार बस आणि मारुती व्हॅनमध्ये धडक झाली. या धडकेत चार नागरिक जखमी झाले. यातील दोन व्यक्ती हे गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने लता मंगेशकर रुग्णालयात दखल करण्यात आले. दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती व्हॅन (क्रमांक एम.एच. ३१/बी.बी./२३५२) ही हिंगण्यावरून नागपूरला येत होती. दरम्यान, वासुदेवनगर येथे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकतर्फी वाहतूक आहे. तर स्टार बस (क्रमांक एम.एच.३१/सी.ए./६0५४) ही बर्डी ते हिंगणा मार्गावर प्रवास करत होती. व्हॅन मधील सर्व प्रवासी हे दक्षिण नागपुरातील आहेत. दरम्यान, वासुदेवनगर येथे एकतर्फी वाहतूक सुरू असल्यामुळे स्टार बस चालकाचे त्याच्या वाहनावरून नियंत्रण सुटले आणि बसने व्हॅनला धडक दिली. या अपघातात चार नागरिक हे जखमी आहेत. जखमींमध्ये बाळू कुसंबा मेश्राम (वय ५0, रा. रमाबाईनगर, रामेश्वरी), भोजराज राजाराम मेश्राम (वय ६२, रा. चंद्रमणीनगर) वसंता चहांदे ( वय ६५, रा. चंद्रमणीनगर), मनोज बागडे (वय ५0, रा. चंद्रमणीनगर) यांचा समावेश आहे. यातील बाळू मेश्राम आणि मनोज बागडे हे गंभीर जखमी आहेत. तर भोजराज मेश्राम व वसंता चहांदे यांना किरकोळ जखमा झाल्या. सर्व जखमींना लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply