लसीकरणाच्या जुमला व्हर्जनने नागरिकांचे प्राण वाचणार नाही – राहुल गांधी

नवी दिल्ली : २७ ऑक्टोबर – काँग्रेस खासदार राहुल गांधींनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडले आहे. लसीकरणाच्या “जुमला व्हर्जनने” नागरिकांचे प्राण वाचणार नाही अशा शब्दांत राहुल यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधींनी ट्विटरवर एक ट्विट शेअर करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसच अध्यक्ष सोनिया गांधींच्या एका वर्तमानपत्रात छापून आलेल्या लेखाचा फोटो राहुल गांधींनी शेअर केला आहे. अजूनही देशातील मोठ्या लोकसंख्येला लसीचा एकही डोस मिळाला नसल्याच्या वस्तुस्थितीकडे सोनिय गांधींनी या लेखातून लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारने तातडीने लसीकरणाचा वेग वाढवून अधिकाधिक नागरिकांना लसीकरणाच्या कक्षेत आणण्याचा सल्ला सोनियांनी या लेखातून दिला आहे. या लेखासोबत राहुल गांधींनी लसीकरणाच्या “जुमला व्हर्जनने” नागरिकांचे प्राण वाचणार नाही असे ट्विट टाकले आहे.
काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर खात्यावरूनही सोनिया गांधींचा हा लेख शेअर करण्यात आला आहे. लस मोफत असल्याचे पंतप्रधान जोर देऊन सांगत आहेत. मात्र लस या आधीपासूनच मोफत असल्याचे ते सोयीस्करपणे विसरत आहेत. भाजप सरकारने भारताच्या मोफत लसीकरणाच्या धोरणाला हरताळ फासल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनीही हा लेख शेअर केला आहे. लसीकरणाचा वेग वाढवून सर्वांनाच मोफत लस पुरविण्याची गरज असल्याचे प्रियंका गांधींनी म्हटले आहे. याशिवाय काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही हा लेख शेअर करत केंद्रावर टीका केली आहे.

Leave a Reply