मला अतिशय आनंद होतोय, कारण ही जनतेची योजना – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २७ ऑक्टोबर – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेवर महाविकास आघाडी सरकारनं गंभीर आरोप केले होते. इतकंच नाही तर या योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी एक समितीही नेमण्यात आली होती. मात्र, या समितीकडून आता जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागानं हा अहवाल दिलाय. या अहवालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मला अतिशय आनंद होतोय, अशी प्रतिक्रिया दिलीय.
‘मला अतिशय आनंद होतोय. कारण ही जनतेची योजना आहे, जनतेने राबवलेली योजना आहे. यापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने एक तज्ज्ञ समिती नेमली होती. देशभरातील तज्ज्ञ त्यात होते. त्या समितीने ही योजना कशी योग्य आहे आणि कसं योग्य काम यात झालं आहे, असा एक अहवालही त्या समितीने दिला होता. तो अहवालही उच्च न्यायालयाने स्वीकारला होता. त्यामुळे आता हा जो अहवाल आला आहे, तो त्याला अनुरुप असेल. हे खरं आहे की यात काही तक्रारी असू शकतात, मी स्वत: सांगितलं होतं की 600 वेगवेगळ्या तक्रारी आहेत, त्याती चौकशी केली जाईल आणि ती चौकशी झाली पाहिजे. मला असं वाटतं की 6 लाख कामांमधील 600 कामांची चौकशी ही फार मोठी गोष्ट नाही. ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्याचं मी समर्थन करणार नाही. पण त्यामुळे या संपूर्ण योजनेला बदनाम करणं, हे पूर्ण चुकीचं आहे’, असं फडणवीस म्हणाले.

Leave a Reply