नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार – उपेंद्र तिवारी

लखनौ : २७ ऑक्टोबर – उत्तर प्रदेशातील भाजपा मंत्री उपेंद्र तिवारी यांचं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाचा अवतार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हरदोई येथील एका सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. “नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत,” असं ते म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदींचा अभिमान बाळगा ते नवयुगाचे निर्माते आहेत. असा महापुरुष या धरतीवर एकदाच येतो. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत. एका प्रधानसेवकाच्या रुपात आपल्यामध्ये काम करण्यासाठी ते आले आहेत,” असं उपेंद्र तिवारी यांनी म्हटलं आहे.
नुकतंच उत्तर प्रदेशातील ‘या’ भाजपा नेत्याने वाढत्या इंधनदारावर बोलताना देशातील ९५ टक्के लोकांना पेट्रोलची गरज नाही असं आश्चर्यकारक विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन जोरदार टीकादेखील करण्यात आली होती. “भारतामध्ये चारचाकी गाड्या चालवणाऱ्या मोजक्या लोकांना पेट्रोलची गरज असते. ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही,” असं वक्तव्य उपेंद्र तिवारी यांनी केलं.
“सरकारने करोनाच्या लसी आणि करोनावरील उपचार मोफत पुरवले आहेत. इंधनाचे दर वाढलेले नाहीत. तुम्ही जर दरडोई उत्पन्न आणि इंधनाच्या दरांमध्ये झालेली वाढ याची तुलना केली तर इंधनाचे दर फार कमी आहेत,” असा युक्तीवाद तिवारी यांनी केला होता.

Leave a Reply