संपादकीय संवाद – नागपुरात व्यावसायिक चित्रपट निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरु होणे गरजेचे

काल नवी दिल्ली येथे आयोजित एका शानदार समारंभात नागपूरकरांच्या सहभागाने निर्माण झालेल्या बार्डो या चित्रपटाला भाषा विभागातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे, ही नागपूरकरिता अत्यंत अभिमानाची बाब आहे. यासाठी चित्रपट निर्मिती करणारी चमू आणि समस्त नागपूरकरांचे पंचानामातर्फे हार्दिक अभिनंदन.
नागपूरचे डॉ. निषाद नटचंद्र चिमोटे यांच्या पांचजन्य या संस्थेने बार्डोची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची पटकथा नागपूरकर श्वेता पेंडसे यांची असून, श्वेताची या चित्रपटात प्रमुख भूमिकाही आहे. त्याशिवाय नागपूरकर रोहन गोखले यांचे संगीत नियोजन देखील या चित्रपटाला देण्यात आलेले आहे. नागपूरच्या इतिहासात अश्याप्रकारे एखाद्या चित्रपटाला राष्ट्रीय सन्मान मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
या निमित्ताने नागपूरकरही चित्रपट, नाट्य आणि केला क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. इतिहासात डोकावून बघितल्यास या पूर्वीही नागपुरातील अनेक कलावंतांनी व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. पुरुषोत्तम दारव्हेकर, मोहन कोठीवान, राजदत्त अश्या ज्येष्ठांपासून तर आजच्या पिढीतल्या अविष्कार दारव्हेकरपर्यंत अनेक नावे आपल्याला सांगता येतील. विशेष म्हणजे नागपुरात अनेक गुणी कलावंत असूनही नागपुरात व्यावसायिक रंगभूमी किंवा व्यावसायिक चित्रपटसृष्टी निर्माण होऊ शकली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. काही वर्षांपूर्वी नागपुरातील सारथी या सामाजिक संघटनेने नागपुरात चित्रनगरी उभारली जावी, यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र राज्यशासनाने त्यादृष्टीने पाऊले उचलणे तर सोडाच पण दुर्लक्षच केले, त्याआधीही जुन्या मध्य प्रांतात तत्कालीन मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला यांनीही नागपुरात चित्रनगसरी उभारण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र कारणे कोणती झाली, याची कल्पना नाही पण आजही नागपुरात व्यावसायिक चित्रसृष्टी उभारली गेली नाही. नाही म्हणायला दूरचित्रवाणी क्षेत्रात काम करणाऱ्या अजय राजकारणेंसारख्या काही उत्साही तरुणांच्या संघटना उभ्या राहिल्या आहेत, मात्र त्यांची संख्याही बोटावर मोजण्याइतकीच राहिलेली आहे.
सारथी या संघटनेने १९९३-९४ या काळात या विषयावर सर्वेक्षण करून एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता, चित्रनगरी उभी झाली तर किती व्यक्तींना कश्याप्रकारे रोजगार मिळेल याची सविस्तर माहिती त्या अहवालात देण्यात आली होती. त्यापूर्वीही असे एक खासगी युनिट उभारण्यासाठी अर्थसाहाय्य करावे किंवा नाही यावर विचार करतांना स्टेट बँकेच्या नागपूर शाखेने सर्वेक्षण केले होते, तेव्हाही यातुन किती व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळू शकेल याची माहिती देण्यात आली होती, असे असूनही राज्य सरकारने नागपुरात चित्रनगरी उभारण्यासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत, त्याचबरोबर व्यक्तिगत स्तरावर असे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाही हतोत्साहित करून पाय ओढण्यातच सरकार आणि नागरिकांनी धन्यता मानली.
इतिहासात जे घडले ते घडले मात्र नागपुरात दर्जेदार चित्रपटनिर्मिती होऊ शकते, हे नागपूरकरांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ही बाब लक्षात घेत नागपुरात मोठ्या प्रमाणात चित्रपट, दूरदर्शन मालिका जाहिराती, युट्युब मालिका या सर्वांच्या निर्मितीचा व्यवसाय पुढे यावा यासाठी सरकार आणि समाजाने प्रयत्न करावे इतकेच आज या निमित्ताने सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply