गोव्यातील भाजप सरकार सर्वाधिक भ्रष्ट – सत्यपाल मलिक

नवी दिल्ली : २६ ऑक्टोबर – मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भाजपला अडचणीत आणणारं आणखीन एक विधान केलंय. गोव्यातील भाजप सरकार सर्वाधिक भ्रष्ट असल्याचा दावा मलिक यांनी केलाय. इतकंच नाही तर, या प्रश्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत: लक्ष घालण्याची सूचनाही सत्यपाल मलिक यांनी केलीय.
गोव्यातील भाजप सरकार कोविडशी योग्य पद्धतीनं दोन हात करण्यात अयशस्वी ठरलं, या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. गोवा सरकारनं जे काही केलं त्यात भ्रष्टाचार होता. सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच मला राज्यपाल पदावरून हटवण्यात आलं’ असा खळबळजनक दावाही सत्यपाल मलिक यांनी यावेळी केलाय.
‘मी लोहियावादी आहे, मी चरणसिंह यांच्यासोबतही वेळ व्यतीत केला आहे. मी भ्रष्टाचार सहन करू शकत नाही’, असंही त्यांनी म्हटलं. ‘ एका खास मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी हे विधान केलंय.
घरोघरी रेशन वाटण्याची गोवा सरकारची योजना अव्यवहारिक होती. सरकारला पैसे चारणाऱ्या एका कंपनीच्या सांगण्यावरून हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेससहीत अनेक पक्षांनी माझ्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती’ असं सांगतानाच ‘मी या प्रकरणाची चौकशी केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही याची माहिती दिली’, असंही मलिक यांनी म्हटलंय.
‘विमानतळाजवळ एक भाग आहे जिथे खणनासाठी ट्रकांचा वापर केला जातो. कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हे काम रोखण्यास मी सरकारला सांगितलं. परंतु, सरकारनं ऐकलं नाही आणि नंतर हाच भाग कोविडचा हॉटस्पॉट बनला’, असं सांगत गोव्यातील भाजप सरकार आणि आपल्यातील वादांवर मलिक यांनी भाष्य केलं.
सद्य राजभवन पाडून नवं भवन उभारण्याचा गोवा सरकारचा मानस होता. खरंतर याची काहीएक आवश्यकता नव्हती. मात्र, सरकार आर्थिक दबावाखाली असताना त्यांनी हा प्रस्ताव मांडला होता, असं म्हणत सत्यपाल मलिक यांनी गोव्यातील सरकारच्या भ्रष्टाचारची आणखी एक आठवण सांगितली.

Leave a Reply