इंटरव्हलनंतरच राऊत बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार – नितेश राणे

मुंबई : २६ ऑक्टोबर – मुंबई ड्रग्स प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रभाकर साईल यांच्या व्हिडीओनं मोठी खळबळ उडाल्यानंतर आता वानखेडे यांच्या जन्मदाखल्याबाबत मलिकांनी केलेल्या खुलास्यानंतर शिवसेनेच खासदार संजय राऊतही आक्रमक झाले आहेत. इंटरव्हलपर्यंत नवाब मलिकांनी सांगितलं, आता इंटरव्हलनंतर मी बोलणार, असं सूचक वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत काल असं बोलले की इंटरव्हलपर्यंत नवाब मलिक आहेत. इंटरव्हलनंतर मी बोलणार. तर त्यांना मी सांगतो की क्लायमेक्स मी करणार, असा सूचक आणि थेट इशाराच नितेश राणे यांनी राऊतांना दिलाय.
प्रभाकर साईल असेल की नवाब मलिक असतील, ते जे आरोप करत आहेत त्याची शहानिशा तर होणारच आहे. त्यात काही दुमत नाही. शेवटी ते आरोप आहेत, तुम्हाला आरोप सिद्धही करावे लागतात. प्रभाकर साईल नावाचा व्यक्ती पुढे येतो. तो कोण होता? काय होता? त्याची पार्श्वभूमी काय? गेल्या १० – १५ दिवसात तो कुणाशी बोलला? या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत. म्हणून मी सांगतोय की प्रभाकर साईल जे बोलतोय ते तुम्ही सत्य मानत असाल, तर मग सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सुशांतचा सर्वात जवळचा मित्र गणेश हिवरकर नावाचा व्यक्ती होता. तो वारंवार टीव्हीवर सांगत होता, तो माझ्या घरी आला, त्यावेळी एक आमदार मित्रा माझ्यासोबत होते. त्याने मला सांगितलं आहे की, सुशांतसिंह आणि दिशा सालियान प्रकरणात नेमकं काय झालं आणि त्याला कसं धमकावलं गेलं. या आघाडी सरकारमधील एक युवा मंत्री कसा त्याला बाळासाहेब ट्ऱॉमा हॉस्पिटलमध्ये भेटायला आला, किती वाजता भेटायला आला आणि तो नेमकं त्याच्याशी काय बोलला? हे सगळं संभाषण त्याने मला आणि माझ्या आमदार मित्राला सांगितलं आहे.
त्याची सगळी साऊंड रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की प्रभाकर साईल जे बोलतोय ते तुम्ही खरं मानताय आणि माध्यमांमध्ये चालवताय, तेच उद्या मी जेव्हा ही साऊंड क्लिप गणेश हिवरकरची जनतेसमोर आणेल, तेव्हा हिवरकर जे बोलतोय ते खरं समजून तुम्ही संबंधितांवर कारवाई करा आणि चौकशी करा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केलीय.
शिवसेनेचे खासदास संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपला इशारा दिला होता. वसुली गँग कुणाच्या होत्या. मी सांगितलं ना. इंटरव्हलपर्यंतची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे, इंटरव्हलनंतरची कथा स्क्रिनप्ले मी तुम्हाला सांगेन, असं सांगतानाच या प्रकरणातील तथ्य आणि सत्य धक्कादायक आहे. देशभक्तीचा मुखवटा पांघरून काय होतं त्याची चौकशी झाली पाहिजे, असं राऊत म्हणाले.

Leave a Reply